Ishan Kishan Fifty : इशान किशनची मोठी झेप, युवराज-गंभीरला टाकले मागे | पुढारी

Ishan Kishan Fifty : इशान किशनची मोठी झेप, युवराज-गंभीरला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात भारताचा सलामीवीर इशान किशनने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. इशानने त्याच्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले.

षटकार ठोकत फिफ्टी पूर्ण…

इशानने स्टायलिश पद्धतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. 11व्या षटकात केशव महाराजच्या पाचव्या चेंडूवर त्याने गुडघ्यावर बसत स्लॉग स्वीप मारून षटकार खेचला. या षटकारासह ईशानने कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने 37 चेंडूत अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. या मालिकेसाठी कर्णधार म्हणून नेमण्यात आलेला केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडला. तर नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान कर्णधार पदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे देण्यात आली आहे. त्याने इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना डावाची सुरुवात करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करत इशानने तडाखेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले.

भारताची नवी सलामी जोडी मैदानात उतरली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली सुरुवात केली. ऋतुराज आणि इशान यांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. या जोडीने भारतीय संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. 23 धावांवर ऋतुराज बाद झाला. पण इशानने धमाका सुरूच ठेवला. त्याने आधी आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर फटके मारण्यास सुरुवात केली.

टी-20 क्रिकेटमध्ये धडाकेबाज अर्धशतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या इशानने येथेही पन्नास धावा पूर्ण केल्या. पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणाऱ्या या फलंदाजाने आजच्या सामन्यात षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. तो 48 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 76 धावा काढून बाद झाला.

युवराज सिंग आणि गौतम गंभीरला टाकले मागे

इशानने आतापर्यंत केवळ 11 टी-20 डाव खेळले असून त्याने 350 हून अधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीत त्याने भारताचे माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांना मागे टाकले. युवी आणि गंभीरने त्यांच्या पहिल्या 11 T20 आंतरराष्ट्रीय डावात इशानपेक्षा कमी धावा केल्या आहेत. युवीच्या खात्यात 306 तर गंभीरच्या खात्यात 328 धावा आहेत.

Back to top button