भारताला धक्‍का : केएल राहुल, कुलदीप मालिकेबाहेर : कर्णधारपदी पंत | पुढारी

भारताला धक्‍का : केएल राहुल, कुलदीप मालिकेबाहेर : कर्णधारपदी पंत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीस लागली आहे. याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या (गुरुवार) होणार्‍या पहिल्या टी-20 लढतीने होणार आहे. दोन्ही संघांदरम्यान पाच सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळविला जाइैल. मात्र, मालिकेस सुरूवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला जबर धक्‍का बसला असून कर्णधार केएल राहुल व फिरकी गोलंदाज कुलदीप यादव दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतवर सोपविण्यात आली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळणार नाहीत. यामुळे टॉप ऑर्डरमध्ये धावा करण्याची जबाबदारी कर्णधार केएल राहुलवर होती. मात्र, फॉर्ममध्ये असलेला राहुलही जखमी झाला. त्याच्या स्थानी पंतला कर्णधार बनविण्यात आले आहे. कुलदीपच्या जागी कोण खेळणार? हे स्पष्ट झालेले नाही.

सलामीला इशानसोबत ऋतुराज?

सलामीला ऋतुराज गायकवाड व इशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. हे दोघेही आयपीएलमध्ये फ्लॉप ठरले असले तरी टी-20 वर्ल्डकपपूर्वी फॉर्ममध्ये येण्यास त्यांना एक संधी द्यावी लागेल. तर श्रेयस अय्यरला तिसर्‍या क्रमांकावर उतरविण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय ऋषभ पंत आणि संघात पुनरागमन करणार्‍या दिनेश कार्तिकला मधल्या फळीत जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून गमावलेला फॉर्म परत मिळविण्याचा प्रयत्न पंत करेल.

दरम्यान, गुजरातला आयपीएलचे जेतेपद मिळवून देणार्‍या हार्दिक पंड्याला फिनिशरची भूमिका पार पाडावी लागणार आहे. याशिवाय तळच्या खेळाडूंनाही जबाबदारी उचलावी लागणार आहे.

चहल-कुलदीपवर नजर

युजवेंद्र चहल व कुलदीप यादव ही फिरकी जोडी 2019 नंतर प्रथमच एकत्र दिसणार आहे. वर्ल्डकपसाठी रवींद्र जडेजा याचे स्थान निश्‍चित मानले जात असले तरी चहलकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा स्थितीत रवी बिष्णोई, अक्षर पटेल व कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांना दमदार कामगिरी करून आपला दावा मजबूत करावा लागेल.

हेही वाचलतं का?

 

Back to top button