Ketaki Chitale : माझ्या विरोधात 'अदृश्य हात' कार्यरत, केतकी चितळेचा आरोप | पुढारी

Ketaki Chitale : माझ्या विरोधात 'अदृश्य हात' कार्यरत, केतकी चितळेचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल अक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या विरोधातील एफआयआर रद्द करावी अशी मागणी तिने केली आहे. काही “अदृश्य हात” माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावर गदा आणत आहेत, असे तिने या याचिकेत म्हटले आहे.

सोमवारी केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. कळवा पोलिस ठाण्यात नोंद झालेली एफआयआर रद्द करावी, अशी मागणी तिने केली आहे. केतकी विरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंद आहेत. “मी फेसबुकवर लिहिलेल्या कवितेनंतर माझ्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. पोलिसांनी हे गुन्हे नोंदवून घेण्यात मोठा उत्साह दाखवला आहे, तसेच माझी कस्टडीही मागितली आहे. त्यामुळे मला अशी भीती वाटते की काही अदृश्य हात महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात आणि त्यातही माझ्या मनात भीती निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत, असे वाटते.”

केतकीच्या (Ketaki Chitale) विरोधात सुरू असणारा खटला कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर आहे, असे तिच्या वकिलांनी म्हटले आहे. तिच्या विरोधात किती एफआयआर नोंद आहेत, याची माहितीही तिने मागितलेली आहे. एकाच कारणासाठी अनेक एफआयआर दाखल करणे हा कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर आहे. जो गुन्हा या आधीच नोंद झाला आहे, त्याबद्दल पुन्हा गुन्हा नोंदवताना काळजी घेण्याच्या सूचान पोलीस महानिरीक्षकांनी पोलिसांना दिल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. या याचिकेवर १० जूनला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Back to top button