Jos Buttler IPL Final : हार्दिकनं ‘जोस’ वादळ थांबवलं अन् संतप्त बटलरनं फेकलं हेल्मेट, ग्लोव्हज! | पुढारी

Jos Buttler IPL Final : हार्दिकनं 'जोस' वादळ थांबवलं अन् संतप्त बटलरनं फेकलं हेल्मेट, ग्लोव्हज!

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन

Jos Buttler IPL Final : कर्णधार हार्दिक पंड्याच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर आपला पहिलाच हंगाम खेळणार्‍या गुजरात टायटन्सने आयपीएल (IPL 2022) २०२२ चे विजेतेपद पटकावले. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला ७ विकेटस्नी हरवले. कर्णधार हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार ठरला त्याने गोलंदाजीत ३ विकेटस् घेतल्या तर फलंदाजीत ३४ धावा जोडल्या. त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

टॉस जिंकून फलंदाजी करताना राजस्थानची सलामी जोडी जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल विशेष काही करु शकली नाही. जयस्वाल लवकरच बाद झाला. पण जोस बटलरने क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पंड्याने १३ व्या षटकांतील पहिल्याच चेंडूवर जोस बटलरची विकेट घेतली. बटलर शॉर्ट पिच चेंडूवर आपली विकेट गमावून बसला. बटलर चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने याआधी शानदान शतकी खेळी केली आहे. पण फायनलमध्ये बटलर क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही. आउट झाल्यानंतर डग आउटच्या दिशेने जात असताना बटलर संतप्त झाल्याचे दिसून आले. मैदानातून तंबूत परतताना पहिल्यांदा त्याने आपले तोंड हेल्मेटमध्ये लपवले. त्यानंतर त्याने डग आउटजवळ हेल्मेट आणि हातमोजे फेकून दिले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. त्याने २०१६ साली ९७३ धावा केल्या होत्या. त्यानंतर या यादीत दुसर्‍या स्थानावर होता तो डेव्हिड वॉर्नर. ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरने एका हंगामात ८२४ धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यामुळे या सामन्यात जोसने १०व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि २५ धावा पूर्ण करत वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला. त्याचबरोबर आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही जोस बटलरने आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम वॉर्नरच्या नावावर होता, त्याने एका हंगामात प्ले ऑफमध्ये १९० धावा केल्या होत्या. बटलरने यावेळी प्ले ऑफमध्ये २००पेक्षा जास्त धावा केल्या. (Jos Buttler IPL Final)

जोस बटलर (८६३ धावा) हा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. तर युजवेंद्र चहल (२७ विकेट) चा मानकरी ठरला आहे.

Back to top button