पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ चा विजेता ((IPL 2022 Final) कोण होणार? याकडे संपूर्ण किक्रेट विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. विजेतेपदासाठी रविवारी (दि.२९) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ भिडणार आहेत. साखळी सामन्यात नवख्या गुजरात संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्या अंतिम सामन्यात विजय मिळवून विजेतेपदाचा करंडक उंचावण्यास हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ उत्सुक असेल.
आयपीएल २०२२ च्या या मोसमात गुजरातचा संघ ज्या प्रकारे खेळला आहे, ते पाहता यावेळी चाहत्यांना नवा चॅम्पियन मिळणे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे. गुजरातने पहिल्या साखळी फेरीत १० विजयांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावले. त्यानंतर शेवटच्या षटकात पात्रता फेरीत १८८ धावांचे यशस्वी पाठलाग करून अंतिम फेरीत (IPL 2022 Final) धडक मारली.
आयपीएलच्या या मोसमात राजस्थानविरुद्ध गुजरातचा वरचष्मा आहे. कारण गुजरातकडे उर्वरित संघांपेक्षा जास्त मॅच विनर्स आहेत. गुजरातने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ८ सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. प्रत्येक सामन्यात संघासाठी वेगवेगळ्या खेळाडूंनी मॅच विनर्सची भूमिका निभावली आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने गुजरातसाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. तर कधी राशिद खानने फलंदाजीत चमकदार कामगिरी करत सामना खिशात घातला आहे. उर्वरित संघांनी डेव्हिड मिलरपासून दूर राहिल्यावर पहिल्यांदाच गुजरातमध्ये दाखल झालेल्या मिलरने स्वतःच्या जोरावर गुजरातला दोन सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. राहुल तेवतिया यांनेही मॅच फिनिशर म्हणून संघाच्या विजयाला हातभार लावला आहे. तर कधी रशीदने गोलंदाजीच्या बळावर पारडे फिरवले आहे.
आतापर्यंतच्या स्पर्धेचा विचार करता गुजरात टायटन्सने जबरदस्त यश मिळवले आहे. वास्तविक नवखा संघ असल्याने त्यांच्याकडून ही अपेक्षा कोणीही ठेवली नसेल. पण त्यांनी दिमाखात सर्वात आधी पात्रता फेरी गाठली आणि गुणतक्त्यात ते टॉपवरही राहिले. संघातील खेळाडू प्रतिभावान असले, तरी एक संघ म्हणून त्यांच्यात सुसूत्रता आणण्याचे मोठे आव्हान होते. मुंबई इंडियन्सच्या छत्र छायेत तयार झालेल्या हार्दिक पंड्याने हे शिवधनुष्य चांगले पेलले. प्रत्येक सामन्यागणिक त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि ते आता अंतिम सामना खेळत आहेत.
हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा या जोडीने गुजरातच्या नव्या संघाची बांधणी उत्कृष्ट केली आहे. आता हा संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर अधोरेखित झाले आहे. त्यामुळेच आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा प्रमुख दावेदार गुजरात संघ मानला जात आहे. हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून सर्वांना प्रभावित केले आहे. गुजरात अंतिम फेरीत पोहोचल्याने ड्रेसिंग रूममधील वातावरण रोमांचित झाले आहे. सर्व टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक खेळाडू आपल्यातील सर्वोत्तम गुण देऊन संघाला विजय मिळवून देण्यासाठी आसुसलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच आयपीएलमध्ये एंट्री केलेला गुजरात संघ ट्रॉफी जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचलंत का ?