Olympic हॉकी जल्लोष : कोल्हापुरातील या गावात आहेत घरोघरी हॉकीपटू | पुढारी

Olympic हॉकी जल्लोष : कोल्हापुरातील या गावात आहेत घरोघरी हॉकीपटू

नूल : पुढारी वृत्तसेवा

Olympic हॉकी जल्लोष : पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकल्याने हॉकी लाईम लाईटमध्ये आले. पण कोल्हापूर जिल्ह्यातील नूलमधील इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूल भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीला तगड्या खेळाडूंची रसद पुरवण्याचे काम गेल्या अनेक दशकांपासून करत आले आहे.

टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने कांस्य पदक पटकावले. महिला संघाने इतिहासात पहिल्यादाच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. त्यांचे पदक थोडक्यात हुकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकीने देशाची मान उंचावत गतवैभव प्राप्त केले. त्यामुळे गावागावात पोहोचलेल्या हॉकीला नव संजीवनी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूल

कोल्हापूरमधील गडहिंग्लज तालुक्यातील नूल गावही असेच हॉकीला राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंची रसद पुरवण्यात अग्रेसर आहे. या गावातील इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूल या शाळेचा सिंहाचा वाटा आहे. शाळेने घराघरात हॉकी खेळाडू निर्माण केला आहे. म्हणूनच या गावाला हॉकीची पंढरी असा नावलौकिक प्राप्त झाला आहे.

गावात प्रवेश करताच उजव्या हाताला भल्या मोठया क्रीडांगणावर इवलीशी मुले हातात हॉकी स्टीक घेवून पळताना दिसतात. इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूल या शाळेने अनेक वर्ष हॉकी स्पर्धेत नाव कमावून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्याबरोबरच खेळाडूंना उज्वल भविष्य निर्माण करून दिले आहे.

१९७७ मध्येच शाळेत हॉकीचा पाया रचला

त्यामुळे शाळेचे हॉकीतील योगदान सर्वश्रुत आहे. माजी क्रीडा शिक्षक एस. आर. जाधव यांनी हॉकीचा पाया सन १९७७ साली घातला. हॉकी हा महागडा खेळ असून ही शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने प्रतिकूल परिस्थितीत अर्थसाहाय्य करून हा खेळ जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.

इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूल ही शाळा कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला ग्रामीण, डोंगरी भागात आहे. तरीही हॉकीचा खेळ जोपासून नवोदित हॉकीपटू निर्माण करणारी शाळा म्हणून तिचा नावलौकिक आहे. जाधव सरांच्या नंतर सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक बी. बी. तराळ, कै.डी. एस. चव्हाण, विद्यमान क्रीडाशिक्षक आर. ए. चौगुले, एम. पी. मांगले, अनिकेत मोरे तसेच काही माजी खेळाडूंनी हॉकीची परंपरा अखंडित राखली आहे.

शाळेने शेकडो राष्ट्रीय खेळाडू घडवले

आतापर्यंत गेल्यात त्रेचाळीस वर्षात या शाळेने ५०० हून अधिक राष्ट्रीय हॉकी खेळाडू निर्माण केले. दरवरषी ८ ते १० खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवडले जातात. शाळेच्या दहा ते बारा खेळाडूंची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झालेली आहे. हॉकी खेळात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरु चषक स्पधेत १९८४, २००३, २०१२ अशा तीनवेळा शाळेच्या संघाने दिल्लीवर स्वारी केली आहे.

शाळेचा हॉकीचा इतिहास पाहून भारतीय खेल प्राधिकरणाने मिनी खेलो इंडिया सेंटर शाळेला मंजूर केले आहे. त्या माध्यमातून तज्ज्ञ प्रशिक्षक, क्रीडा साहित्य, क्रीडांगण देखभाल दुरुस्ती इत्यादी सुविधा खेळाडूंना उपलब्ध होणार आहेत.

इंदिरादेवी जाधव इंग्लिश स्कूलचे अनेक खेळाडू भारतीय सैन्य दल, पोलीस खाते, हवाई दल, होमगार्ड, डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशा विविध क्षेत्रामध्ये उच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. सध्या संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा नडगदल्ली, सेक्रेटरी नानप्पा माळगी व संचालक मंडळ यांच्या प्रोत्साहनाने आणि महिला हॉकी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद नाईकवाडी, प्राचार्य जे.डी. वडर, पर्यवेक्षक जी. आर. चोथे यांच्या प्रेरणेतून हॉकीची पताका अखंड फडकत राहिली आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : ७० हजार जणांना बेघर करणाऱ्या पानशेत प्रलयाला ६० वर्षे पूर्ण 

Back to top button