रवीकुमार दहिया वर हरियाणा सरकारचा पैसे, जमीन, नोकरीच्या घोषणांचा पाऊस | पुढारी

रवीकुमार दहिया वर हरियाणा सरकारचा पैसे, जमीन, नोकरीच्या घोषणांचा पाऊस

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कुस्तीपटू रवीकुमार दहिया टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाचा मानकरी ठरला. त्याने ५७ किलो वजनी गटात फ्री स्टाईल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती. पण, सुवर्ण पदकाच्या लढतीत तो रशियाच्या झावूर उगेव्हकडून पराभूत झाला. त्यामुळे त्याला रौप्य पदकावरच सामाधान मानावे लागले.

तरी रवीकुमार दहिया सुवर्ण पदकाला गवसणी घालू शकला नसला तरी त्याच्या रौप्य पदकाचे भारतभरातून कौतुक होत आहे. हरियाणा सरकारने तर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षावच केला. हरियाणा सरकारने रवीकुमार दहियाला ४ कोटी रुपये, क्लास वर पोस्टची नोकरी आणि हरियाणात तो कोठे म्हणेल तिथे जमीनही ५० टक्के सवलतीने देऊ केली आहे. याचबरोबर त्याचे गाव नाहरी येथे इंडोअर कुस्तीचे मैदान देखील राज्य सरकार बांधून देणार आहे.

रवीकुमार दहिया अखेरपर्यंत झुंजला

रवीकुमार दहिया आणि झावूर उगेव्ह यांच्यातील सामन्यात उगेव्हने आपले वर्चस्व राखले. त्याने रवीकुमारला वरचढ होण्याची संधी दिली नाही. त्यामुळे भारताच्या ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.

उगेव्हने सावध सुरुवात करत एक एक गुण घेत आघाडी घेतली. रवीकुमार दहिया पिछाडीवर पडला होता. मात्र त्याने जोरदार मुसंडी मारत उगेव्हशी बरोबरी केली. उगेव्हने आपली ताकद दाखवत ही बरोबर मोडीत काढून पहिल्या हाफमध्ये ४ – २ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याने ही लीड दुप्पट केली.

रवीकुमार दहियाने रौप्य पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याच्या फायटिंग स्पिरिटचे कौतुक केले. रवीकुमार दहिया याने भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाचवे पदक जिंकून दिले. याचबरोबर तो ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा कुस्तीपटू ठरला.

यापूर्वी सुशील कुमार ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहचला होता. याचबरोबर योगेश्वर दत्तने कांस्य पदक जिंकले होते. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी १९५२ साली कांस्य पदक जिंकून कुस्तीत पहिले पदक जिंकण्याचा विक्रम केला होता. तर साक्षी मलिकने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. ती भारताकडून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : राजर्षी छ. शाहू महाराजांच्या समोर कोल्हापूरचे मल्ल पराभूत झाले आणि मग घडला इतिहास

Back to top button