Umran Malik : IPL चा ‘टॉप’ गोलंदाज उमरानचे रवी शास्त्रींनी कान टोचले, कारण… | पुढारी

Umran Malik : IPL चा ‘टॉप’ गोलंदाज उमरानचे रवी शास्त्रींनी कान टोचले, कारण...

मुंबई; पुढारी ऑनलाईन : जम्मू एक्सप्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरचा 22 वर्षांचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) आपीएलच्या (IPL2022) चालू हंगामात आपल्या वेगाने सर्वांना प्रभावित केले आहे. आयपीएलमधील त्याच्या वेगवान गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी त्याला कडक शद्बात इशारा देत एकप्रकारे कानटोचणीच दिली आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांच्या भूवया उंचावल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये तुम्ही अनेक विक्रम करु शकता पण, तुमच्या प्रतिभेत सातत्य न राहिल्यास त्या विक्रमांना काहीच महत्त्व उरत नाही, असा सल्ला शास्त्री गुरुजीनी उमरान मलिकला दिला आहे.

उमरान मलिकचे भारतीय संघात पदार्पण (Umran Malik) 

माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हे एका क्रीडा वाहिनीच्या विशेष कार्यक्रमात उमरान मलिक विषयी बोलताना म्हणाले, तो जेव्हा चेंडू योग्य ठिकाणी टाकत नाही, तेव्हा फलंदाज त्या चेंडूस दुप्पट गतीने मैदाना बाहेर भिरकावून देतो. रवी शास्त्री यांना असे वाटते की, उमरान मलिक लवकर भारतीय संघात पदार्पण करेल. पण, हे बरोबर नाही की चेंडू १५६ च्या गतीने बॅटवर आदळेल आणि २५६ गतीने सीमारेषे बाहेर जाईल. गती चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबत एक गोष्ट डोक्यामध्ये कायम ठेवावी लागेल की चेंडू योग्य ठिकाणीच टाकला गेला पाहिजे.

१५७ च्या गतीचा काही फरक पडत नाही (Umran Malik) 

मलिकने दिल्लीविरुद्ध ताशी १५७ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करून सर्वांनाच चकित केले. या चेंडूसह, तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा पहिला भारतीय गोलंदाजही ठरला. मात्र, वेगवान चेंडू असूनही त्याला चौकार खावा लागला. शास्त्री म्हणतात, ‘जर तुम्ही स्वत:ला नियंत्रणात ठेऊ शकला नाही, तर त्याचा तुम्हालाच त्रास होईल’.

रवी शास्त्री पुढे म्हणाले, स्पर्धा जसजशी पुढे सरकेल तसतसे गोलंदाजांना खेळपट्टीपासून मदत मिळणे कमी होईल आणि साहजिकच याचा फायदा फलंदाजांना मिळेल. अशा स्थितीमध्ये तुम्हाला सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. मला असे वाटते, की १५६ आणि १५७ इतक्या गतीमुळे या प्रकाराला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला योग्य ठिकाणी चेंडू टाकावा लागेल. जर उमरानने स्टम्पला टार्गेट केले तर त्याच्यात अधिक सातत्य राहिल.

आयपीएलच्या चालू हंगामात उमरान मलिक याने ११ सामने खेळले आहेत. यामध्य २४.२६ च्या सरासरीने १५ बळी मिळविण्यात सफलता मिळवली आहे. उमरान हा सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीमध्ये १० व्या स्थानी आहे.

Back to top button