IPL Corona : आयपीएल रद्द होईल का? जाणून घ्या BCCI चे नवे नियम

IPL Corona : आयपीएल रद्द होईल का? जाणून घ्या BCCI चे नवे नियम

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15 व्या हंगामाच्या चौथ्या आठवड्यात कोविड-19 चे रुग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. कडक क्वारंटाइन नियम आणि बायो-बबल असूनही, सोमवारी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तथापि, संध्याकाळी उशिरा खेळाडूची आरटी-पीसीआर चाचणी निगेटीव्ह आली आहे. मात्र, धोका अद्याप टळला आहे, याबाबत कसलीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.

पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने आज महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली. या माहितीनुसार दिल्ली संघातील एक ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू आणि एका संघ सदस्याला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर दोघांची तपासणी करण्यात आली. यात त्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली. यापूर्वी टीम फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनाही संसर्ग झाला होता. दरम्यान त्यांना यापूर्वीच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आयपीएललाही कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात 3 दिवसांत 3 संघांचे 4 खेळाडू, 2 प्रशिक्षक आणि 2 इतर कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली, अन् आयपीएल केवळ 29 सामन्यांनंतर थांबवण्यात आले. नंतर, आयपीएलचे उर्वरित 31 सामने ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये खेळले गेले. चला तर बीसीसीआय आणि आयपीएलने कोरोनाबाबत काय नियम बनवले आहेत ते जाणून घेऊया…

स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी आहे का?

यावेळी स्टेडियमच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

IPL दरम्यान एखाद्या खेळाडूला किंवा सदस्याला संसर्ग झाल्यास काय होते?

एखादा खेळाडू किंवा संघ सदस्य कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्यास त्याला सात दिवसांसाठी वेगळे केले जाईल. या दरम्यान सहाव्या आणि सातव्या दिवशी त्यांची कोविड चाचणी केली जाईल. संघाच्या बायो-बबलमध्ये सामील होण्यासाठी, त्याला 24 तासांच्या कालावधीत सलग दोन आरटी-पीसीआर चाचण्या निगेटीव्ह येणे आवश्यक्य आहे.

फ्रँचायझीचे बहुतेक खेळाडू कोविड-19 मुळे खेळण्यासाठी उपलब्ध नसतील तर?

अशा परिस्थितीत 12 सदस्य उपलब्ध असल्यास फ्रेंचायझीला 11 खेळाडूंसोबत जाण्यास सांगितले जाईल. यामध्ये सात भारतीय खेळाडू आणि एक बदली खेळाडू असेल. एखाद्या संघाकडे किमान 12 खेळाडू उपलब्ध नसतील तर BCCI दुसऱ्या दिवशी तो सामना आयोजित करेल. तसे न झाल्यास हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल. तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम असेल.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी बायो-बबलमध्ये किती बदल झाला?

यावेळी बायो-बबलमधील सर्वात मोठा बदल कठोर क्वारंटाईन ठेवण्याबाबतचा आहे. गेल्या वेळी खेळाडू आणि सदस्यांना सात दिवस क्वारंटाईन करावे लागले होते. यावेळी ते कमी करण्यात आले आहे. खेळाडू आणि सदस्यांना फक्त तीन दिवस क्वारंटाईन करावे लागेल. तीन दिवस दर 24 तासांनी सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाईल. हे नियम इतर बायो-बबलमधून येथे आलेल्या खेळाडूंना किंवा सदस्यांना लागू होणार नाहीत. द्विपक्षीय मालिका, फ्रँचायझी शिबिरे, देशांतर्गत स्पर्धा आणि राष्ट्रीय शिबिरांमधून अनेक खेळाडू आणि सदस्य थेट आयपीएल खेळण्यासाठी येत आहेत. त्यांना अलग ठेवण्याची गरज नाही.

लीग सामने कुठे खेळले जात आहेत?

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यावेळी महाराष्ट्रातील दोन शहरातील चार मैदानांवर लीग सामने खेळले जात आहेत. मुंबईतील वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना विमानतळावर जाण्याची गरज भासणार नाही. ते या स्टेडियम दरम्यान बसने प्रवास करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news