मुंबई : वृत्तसंस्था
हार्दिक पंड्याने अष्टपैलू कामगिरी करून आपल्या गुजरात टायटन्स संघाला गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध 37 धावांनी दिमाखदार विजय मिळवून दिला. त्यामुळे पाच सामन्यांतून चार विजयांसह गुजरातने आपली गुणसंख्या आठवर नेली असून त्यांनी गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राजस्थानने अव्वल क्रमांक गमावला असून त्यांचे पाच सामन्यांतून सहा गुण झाले आहेत. तीन विजय आणि दोन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. पंड्याने 87 धावांची सुनामीसारखी खेळी केली आणि टिच्चून गोलंदाजी करत एक बळीही मिळवला.
विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या राजस्थानला 9 बाद 155 पर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून जोस बटलरने 54 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने 24 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व तीन षटकार ठोकले. मात्र, दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याला खातेही खोलता आले नाही. बढती देण्यात आलेला रविचंद्रन अश्विन हाही 8 धावा करून बाद झाला, तर कर्णधार संजू सॅमसन यालाही अवघ्या 12 धावा करता आल्या. बटलर आणि अश्विन यांना लॉकी फर्ग्युसनने तंबूत पाठवले. तसेच पडिक्कल याला यश दयाळने बाद केले. संजू सॅमसन चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबाद झाला. हार्दिक पंड्याने सुरेख थ्रो करून ही किमया साधली. 10 षटकांचा खेळ संपला तेव्हा राजस्थानने 4 गड्यांच्या मोबदल्यात 89 धावा केल्या होत्या. दरम्यान, रासी व्हॅन दुसेन याला यश दयाळने मॅथ्यू वेडकरवी झेलबाद केले. त्यामुळे गुजरातच्या गोटात आनंदाला उधाण आले. कारण, राजस्थानचा निम्मा संघ तंबूत परतला होता.
गुजरातच्या सर्वच खेळाडूंनी या लढतीत झकास क्षेत्ररक्षण केले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर याने 17 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह 29 धावा करून सामन्यात रंग भरला. तथापि, मोहम्मद शमीने त्याला राहुल तेवतियाकरवी झेलबाद केले. त्यानंतर जेम्स नीशाम मैदानात उतरला. आता गुजरातचे काम अधिक सोपे झाले. विजय त्यांना खुणावू लागला होता. धोकादायक रियान पराग याला फर्ग्युसनने तंबूत पाठवले आणि त्यानंतर राजस्थानचा विजय ही केवळ औपचारिकता ठरली. झालेही तसेच गुजरातकडून लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाळ यांनी प्रत्येकी तीन तर हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.
त्यापूर्वी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून गुजरातला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हार्दिक पंड्याने केलेल्या नाबाद 87 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 192 धावा चोपल्या. पंड्याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना 52 चेंडूंचा सामना करून 8 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली. गुजरातची सुरुवात धक्कादायक झाली. सलामीवीर मॅथ्यू वेड 12 धावांवर धावबाद झाला व तेव्हा संघाच्याही तेवढ्याच धावा झाल्या होत्या. पाठोपाठ अवघ्या 2 धावा करून विजय शंकर तंबूत परतला. कुलदीप सेनने त्याला संजू सॅमसनकरवी झेलबाद केले. फलकावर तेव्हा 15 धावा लागल्या होत्या. त्यानंतर दुसरा सलामीवीर शुभम गिल हा स्थिरावत आहे असे वाटत असतानाच रियान परागचा बळी ठरला. त्याचा झेल शिमरॉन हेटमायरने छानच घेतला. मग हार्दिक पंड्या आणि अभिनव मनोहर ही जोडी जमली व त्यांनी राजस्थानच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला.
कुलदीप सेन याला सीमापार पाठवून हार्दिकने आपले अर्धशतक पूर्ण केले ते 34 चेंडूंत. 6 चौकार व 1 षटकार हे त्याचे मुख्य फटके. दुसर्या बाजूने मनोहरची टोलेबाजी सुरूच होती. मात्र नंतर युजवेंद्र चहल याला उंच टोलवण्याच्या नादात मनोहरने रविचंद्रन अश्विनकडे झेल दिला. मनोहरने 4 चौकार व दोन षटकार खेचताना 28 चेंडूंत 43 धावांची सुरेख खेळी केली. डेव्हिड मिलरने 14 चेंडूंत 31 धावा चोपल्या. पाच चौकार व एक षटकार ठोकून त्याने रसिकांचे मनोरंजन केले. राजस्थानकडून कुलदीप सेन, युजवेंद्र चहल आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक गडी तंबूत पाठवला.