Dhanashree Verma : चहलने विकेट घेताच पत्नी धनश्रीचे ‘क्रेझी सेलिब्रेशन’ (Video) | पुढारी

Dhanashree Verma : चहलने विकेट घेताच पत्नी धनश्रीचे 'क्रेझी सेलिब्रेशन' (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ मध्ये मंगळवारी (दि. ५) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचे (Dhanashree Verma) ‘क्रेझी सेलिब्रेशन’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जे पाहून चाहतेही हैराण झाले. धनश्रीच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

राजस्थान रॉयल्स (RR)चा लेग-स्पिनर युझवेंद्र चहल आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी करत आहे. चहलने त्याचा जुना संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने पहिल्याच षटकात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला बाद केले. त्यानंतर चहलने दुसऱ्याच षटकात इंग्लिश फलंदाज डेव्हिड विलीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. याशिवाय त्याने आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला बाद करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. चहलने ४ षटकात केवळ १५ धावा देत २ बळी घेतले. त्याच्या शिवाय ट्रेंट बोल्टनेही दोन बळी घेतले पण बाकीच्या गोलंदाजांची आरसीबीच्या फलंदाजांनी धुलाई केली आणि धावा लुटल्या, त्यामुळे आरसीबीने सामना सहज जिंकला.

या सामन्यादरम्यान चहलची पत्नी धनश्री वर्माही (Dhanashree Verma) स्टेडियममध्ये आपल्या पतीच्या कामगिरीचा जयजयकार करताना दिसली. नवव्या षटकात चहलने डेव्हिड विलीला बाद केल्यावर धनश्रीचे ‘क्रेझी सेलिब्रेशन’ बघायला मिळाले. चहलने विकेट मिळवताच धनश्री आनंद व्यक्त करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. धनश्री इतकी खूश झाली की ती उत्साहात जागेवरून उठून ओरडत उड्या मारायला लागली. हे दृश्य पाहून स्टेडियममध्ये बसलेले इतर चाहतेही आश्चर्यचकित झाले. तिच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बंगळुरूने राजस्थानचा केला पराभव

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १९.१ षटकांतच लक्ष्याचा पाठलाग केला. एक वेळ अशी होती की, अरसीबीची धावसंख्या ५ बाद ८७ होती. पण दिनेश कार्तिक (नाबाद ४४) आणि शाहबाज अहमद (४५ धावा) यांनी तडाखेबाज फलंदाचे प्रदर्शन करत ६७ धावांची भक्कम भागीदारी केली आणि संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. या विजयाबरोबर राजस्थानचे ३ सामन्यांत २ विजय आणि एक पराभवासह ४ गुण झाले आहेत, तर फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीनेही ३ सामन्यांतून २ विजयांसह ४ गुणांची कमाई केली आहे.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्नगाठ बांधली. धनश्री एक उत्तम कोरिओग्राफर आहे आणि तिच्या डान्स क्लिप्स सोशल मीडियातून खूप व्हायरल होतात. धनश्रीचे स्वतःचे एक YouTube चॅनेल देखील आहे, ज्याचे २५.९ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. धनश्री बॉलीवूड गाणी रिक्रिएट करते. याव्यतिरिक्त, ती हिप-हॉपचे प्रशिक्षण देखील देते.

आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने (RR) युझवेंद्र चहलला ६.५० कोटी रुपयांना विकत घेतले. विशेष म्हणजे चहलची जुनी फ्रेंचाइजी आरसीबीने लिलावात या लेगस्पिनरसाठी बोलीही लावली नाही. चहलने आयपीएलमध्ये एकूण ११७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २१.६४ च्या सरासरीने १४६ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ७.५६ राहिला आहे.

Back to top button