SA vs BAN : बांगलादेशने आफ्रिकेत जिंकली पहिली वनडे मालिका | पुढारी

SA vs BAN : बांगलादेशने आफ्रिकेत जिंकली पहिली वनडे मालिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गजांनी भरलेला भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जे करू शकला नाही ते बांगलादेश संघाने (SA vs BAN)करून दाखवले आहे. बांगलादेशने (Bangladesh Cricket Team) दक्षिण आफ्रिकेत जाऊन एकदिवसीय मालिका जिंकली.

अलीकडेच भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता, मात्र वनडे मालिकेत 3-0 असा पराभव पत्करावा लागला होता. बांगलादेशने वनडे मालिकेतील पहिला सामना 38 धावांनी जिंकला. दुसऱ्या सामन्यात त्यांना सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत नऊ विकेट राखून आफ्रिकन भूमीवर पहिली वनडे मालिका जिंकली.

५१ वर्षांच्या एकदिवसीय इतिहासात प्रथमच बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेत (SA vs BAN) जाऊन त्यांच्याविरुद्ध वनडे मालिका जिंकली. या मालिकेसह आफ्रिकेच्या भूमीवर दोन्ही संघांदरम्यान चार द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने तीन आणि बांगलादेशने एक मालिका जिंकली आहे. त्याच वेळी, दोन्ही संघांमध्ये एकूण सहा द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या. यापैकी बांगलादेशने दोन तर दक्षिण आफ्रिकेने चार मालिका जिंकल्या आहेत.

त्याचबरोबर आफ्रिकेच्या (SA vs BAN) भूमीवर दोन्ही संघांमध्ये एकूण 12 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी बांगलादेशने केवळ दोन आणि दक्षिण आफ्रिकेने 10 सामने जिंकले आहेत. याच मालिकेत बांगलादेशने हे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, दोन्ही संघांमध्ये एकूण 24 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये बांगलादेशने सहा तर दक्षिण आफ्रिकेने १८ सामने जिंकले आहेत.

तस्किन अहमदसमोर आफ्रिकन फलंदाजांनी टेकले गुडघे (SA vs BAN)

बांगलादेशच्या तस्किन अहमदने या सामन्यात दमदार गोलंदाजी करत पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना 35 धावांवर माघारी पाठवले आणि दक्षिण आफ्रिकेला 154 धावांत गुंडाळण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेत 10 वर्षांनंतर परदेशी वेगवान गोलंदाजाने वनडेमध्ये पाच विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी 2012 मध्ये श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने 54 धावांत पाच बळी घेतले होते.

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरुवात केली. क्विंटन डी कॉक आणि मलान यांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. यानंतर आफ्रिकन संघाने 37 धावांत पाच विकेट गमावल्या. मलानने सर्वाधिक 39 धावा केल्या. त्यांच्या शिवाय महाराजने २८ आणि प्रिटोरियसने २० धावा केल्या. तस्किनशिवाय शाकिबने दोन बळी घेतले.

तमिम इक्बालच्या कर्णधारपदाची खेळी (SA vs BAN)

155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. कर्णधार तमीम आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. यानंतर शाकिब अल हसनने 18 धावा केल्या. तमिमने ८७ धावांची खेळी केली तर लिटन दास ४८ धावा करून बाद झाला. आफ्रिकेकडून केशव महाराजला एकमेव विकेट मिळाली. सामन्यात पाच आणि मालिकेत आठ विकेट घेणाऱ्या तस्किन अहमदला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

Back to top button