Harbhajan Singh : हरभजन सिंगसह ‘या’ क्रिकेटपटूनी सुद्धा गाजवलंय राजकारणाचे मैदान | पुढारी

Harbhajan Singh : हरभजन सिंगसह ‘या’ क्रिकेटपटूनी सुद्धा गाजवलंय राजकारणाचे मैदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज (Harbhajan Singh) हरभजन सिंग आता राजकारणाच्या मैदानात उतरत आहे. नुकतेच पंजाबमध्ये सत्तेत आलेल्या आम आदमी पक्षाने ४१ वर्षांच्या हरभजन सिंगला पंजाबमधून आपला राज्यसभेचा उमेदवार घोषित केला आहे. भारतासाठी ७११ आंतरराष्ट्रीय बळी घेणाऱ्या भज्जीची तुलना क्रिकेटच्या इतिहासातील टॉपचा ऑफ स्पिनर म्हणून केली जाते. १९९८ मध्ये हरभजन याने भारतासाठी पहिला सामना खेळला. भारताला दोनवेळा विश्वचषक जिंकूण देणाऱ्या संघामध्ये त्याचा समावेश होता. हरभजन फक्त एकटा नाही ज्याने क्रिकेटच्या मैदानासह राजकारणात उडी घेतली आहे. याआधी सुद्धा अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी राजकारणाचे मैदान देखिल मारले आहे. चला जाणून घेऊया कोण कोणत्या खेळाडूंनी राजकारणाच्या मैदानात देखिल नाव कमावले आहे.

Harbhajan Singh

गौतम गंभीर (gautam gambhir)

२००७ आणि २०११ च्या वर्ल्ड कप फाइनलमध्ये भारतासाठी सर्वात मोठी भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरने देखिल क्रिकेट मधून निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला. २०१९ मध्ये गौतम गंभीरने भाजपच्या तिकीटावर पूर्व दिल्ली या लोकसभा मतदारसंघातून तो खासदार म्हणून निवडून आला. त्याला ७ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळाला होता. सध्या राजकारणासोबत तो क्रिकेट समालोचक म्हणून देखिल भूमिका पार पाडत आहे. (Harbhajan Singh)

harbhajan singh

कीर्ती आझाद (kirti azad)

१९८३ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे किर्ती आझाद हे सदस्य होते. शिवाय त्यांचे वडिल भगवत झा आजाद हे बिहारचे मुख्यमंत्री होते. किर्ती आझाद यांनी भाजपकडून दरभंगा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. शिवाय ते दिल्लीमध्ये सुद्धा आमदार होते. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली पण त्यांना पराभव स्विकारावा लागला. आता ते तृणमूल काँग्रेस सोबत कार्यरत आहेत. (Harbhajan Singh)

harbhajan singh

मोहम्मद कैफ (mohammad kaif)

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या मोहम्मद कैफने देखिल राजकारणात हात आजमावले आहेत. २०१४ मध्ये कैफने उत्तर प्रदेशातील फुलपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याने काँग्रेसच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली होती. मात्र, कैफला भाजपचे केशव प्रसाद मौर्य यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. (Harbhajan Singh)

harbhajan singh

मनोज तिवारी (manoj tiwari)

सक्रिय क्रिकेटपटू असून सुद्धा मनोज तिवारी हा पश्चिम बंगालचा क्रीडा राज्यमंत्री आहे. मागील वर्षी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्याने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत विधानसभेची निवडणूक जिंकली. निवडून आल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याच्याकडे क्रीडाराज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवला. मनोज तिवारी याने भारतासाठी १२ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. यंदाचा आयपीएलमध्ये त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.

harbhajan singh

मोहम्मद अझरुद्दीन (mohammad azharuddin)

भारताचा माजी कर्णधार व दिग्गज क्रिकेट पटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीन सोबत वाद देखिल जोडले गेले. वादग्रस्त राहून सुद्धा अझरुद्दीन याने २००९ साली उत्तर प्रदेश येथील मुरादाबाद येथून लोकसभेची निवडणूक जिंकली. सध्या अझरुद्दीन तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षपद सांभाळत आहे.

harbhajan singh

नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu)

नवज्योत सिंग सिद्धू या व्यक्तीला भारतात कोण ओळखत नाही. सिद्धूचा वावर क्रिकेटमध्ये कदाचित कमी राहिला असावा पण, राजकारण, मनोरंजन आणि इतर क्षेत्रात या व्यक्तीने आपली वेगळीचा छाप सोडली आहे. सध्या झालेली पंजाब विधानसभा ही नवज्योत सिंग सिद्धू मुळेच अधिक गाजली असे म्हणावी लागली. शिवाय काँग्रेसला या सत्तेतून पायउतार व्हावे लागले यासाठी अनेकजण सिद्धुलाच जबाबदार धरतात. १९८३ मध्ये भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या सिद्धूची क्रिकेटची कारकिर्द १९९८ पर्यंत चालू राहिली. त्यानंतर २००४ मध्ये सिद्धूने भाजपकडून लोकसभा निवडणूक जिंकली. २००९ मध्ये तो अमृतसरचा खासदार होता. २०१७ मध्ये सिद्धूने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धूला पराभवाचा सामना करावा लागला.

 

Back to top button