IPL History : 7 दिग्गज खेळाडू ज्यांना IPL मध्ये फक्त एकच सामना खेळण्याची मिळाली संधी!

IPL History : 7 दिग्गज खेळाडू ज्यांना IPL मध्ये फक्त एक सामना खेळण्याची मिळाली संधी!
IPL History : 7 दिग्गज खेळाडू ज्यांना IPL मध्ये फक्त एक सामना खेळण्याची मिळाली संधी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL History : आयपीएल (IPL) हे एक व्यासपीठ आहे जिथून अनेक खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट करियरला सुरुवात केली आणि ते त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय संघासाठीही खेळले. या व्यासपीठावरून अनेक खेळाडू उदयास आले. चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्यांना जागतिक क्रिकेटमध्ये नवी ओळख मिळाली. जगातील ही सर्वात लोकप्रिय टी २० (T20) स्पर्धेने नेहमीच खेळाडू आणि प्रेक्षकांना एक अद्भुत भेट दिली आहे. भारताच्या प्रत्येक खेळाडूचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न असते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार खेळाडूही या स्पर्धेत सहभागी होण्यास धडपडत असतात.

काही खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर अनेक वर्षे IPL खेळायला मिळाले आहे. पण असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना अनेक सामने खेळायलाही मिळालेले नाहीत. तर आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी शंभराहून अधिक सामने खेळले आणि स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेल्या संघांचाही ते भाग झाले आहेत. तर असे काही खेळाडू आहेत ज्यांना जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. या सगळ्यामध्ये असे अनेक खेळाडू घडले आहेत ज्यांना आयपीएलच्या इतिहासात फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर ते कधीच मैदानावर दिसले नाहीत. विशेष म्हणजे या यादीत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या दिग्गजांचा समावेश आहे. चला तर त्या तिन्ही खेळाडूंबाबत जाणून घेऊया. (IPL History)

1. युनिस खान… (पाकिस्तान)

पाकिस्तानचा कसोटी स्पेशलिस्ट युनिस खानला आयपीएलच्या पहिल्या हंगामात (२००८) खेळण्याची संधी मिळाली. २००८ च्या आयपीएल लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले होते. त्यावेळी पाकिस्तानचे अकरा खेळाडू त्या वर्षीच्या स्पर्धेत खेळले होते. युनूस त्यापैकी एक होता. राजस्थान रॉयल्सने त्याला फक्त एकदाच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध आपल आयपीएल करियरमधील एकमेव सामना खेळणाऱ्या युनूसने ७ चेंडूत ३ धावा केल्या. त्यानंतर तो कधीही आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. त्या वर्षेचे आयपीएलचे विजेतेपद राजस्थान रॉयल्सने पटकावले. राजस्थान संघात ग्रॅम स्मिथ, शेन वॉटसन, स्वप्नील अस्नोडकर आणि युसूफ पठाण यांसारखे अनेक सामने जिंकणारे स्टार होते. त्यांच्या समोर कसोटी स्पेशलिस्ट युनिस खान फिका पडला आणि तो संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. राजस्थानने तो सामना ४१ धावांनी गमावला. त्या सामन्यानंतर युनिस खानला पुन्हा कधीही आयपीएलमध्ये खेळताना पाहिले गेले नाही. (IPL History)

2. मशरफी मोर्तझा

बांगलादेशचा माजी कर्णधार मशरफी मोर्तझाला २००९ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR)कडून खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्याने आयपीएल करिअरमधील पहिला सामना डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळला. जोहान्सबर्ग येथे दुपारच्या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी केली. ब्रॅड हॉज आणि डेव्हिड हसीच्या चांगल्या खेळीमुळे त्यांच्या संघाने ५ बाद १६० धावा केल्या. मशरफीला डावात उशिरा फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने केवळ २ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना मोर्तझाने चार षटके टाकली आणि १४.५० च्या इकॉनॉमी रेटने ५८ धावा दिल्या. त्याने आपल्या स्पेलमध्ये २ नो-बॉल आणि २ वाइड्स टाकले. मोर्तझाच्या गोलंदाजीच्या कामगिरीने केकेआरला सामना जिंकू दिला नाही आणि त्या सामन्यानंतर तो कधीही आयपीएल प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकला नाही. (IPL History)

3. अकीला धनंजय

श्रीलंकेचा ऑफस्पिनर अकिला धनंजयाने २०१२ साली श्रीलंकेसाठी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तथापि, आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला सहा वर्षे लागली आणि २०१८ मध्ये त्याला पहिली आयपीएल कॅप मिळाली. तो मुंबई इंडियन्सकडून दिल्लीविरुद्ध खेळला. तो सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होत. दिल्लीचा तत्कालीन कर्णधार गौतम गंभीरने टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. सूर्यकुमार यादव, एविन लुईस आणि इशान किशन यांच्या सुरेख खेळींनी मुंबईला २० षटकांत १९४ धावांपर्यंत मजल मारता आली. डावात उशिराने फलंदाजीला उतरताना नवोदित धनंजयाने ५ चेंडूत ४ धावा केल्या. त्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी दुसऱ्या षटकात धनंजयाला चेंडू देण्यात आला. तथापि, त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये तो खूप महागडा ठरला. त्याने एकही विकेट न घेता ४७ धावा दिल्या. (IPL History)

4. आंद्रे नेल

दक्षिण आफ्रिकेचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आंद्रे नेल २००८ च्या आयपीएलच्या हंगामात खेळला. त्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना सनथ जयसूर्याने केलेल्या शानदार ६६ धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने २० षटकांत ८ बाद १७६ धावा केल्या. फलंदाजी करताना नेल शून्यावर धावबाद झाला. वीरेंद्र सेहवागने त्याला माघारी धाडले. त्यानंतर गोलंदाजी करताना नेलने ३ षटके टाकली आणि १०.३३ च्या इकॉनॉमी रेटने ३१ धावा दिल्या. पण गौतम गंभीरला बाद करण्यात तो यशस्वी ठरला; पण तो सामना मुंबई इंडियन्सने गमावला. दिल्लीने धावांचा पाठलाग करताना पाच विकेट्स राखून विजय मिळवला.

5. डॅमियन मार्टिन

ऑस्ट्रेलियन माजी फलंदाज डॅमियन मार्टिनने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने लिलावात आपले नाव नोंदवून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि राजस्थान रॉयल्सने या अनुभवी खेळाडूला विकत घेतले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्याने आयपीएलचा पहिला आणि एकमेव सामना खेळला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ३८ धावांत तीन गडी गमावल्याने त्यांची सुरुवात खराब झाली. त्यानंतर डॅमियन मार्टिनने युसूफ पठाणसोबत भागीदारी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. अखेरीस, प्रवीण कुमारने मार्टीनला बाद केले. त्या सामन्यात मार्टीनला २४ चेंडूत केवळ १९ धावा करता आल्या, तर राजस्थानचा संपूर्ण संघ अवघ्या ९२ धावांमध्ये ऑलआउट झाला. अखेर आरसीबीने दहा गडी राखून सहज विजय मिळवत सामना खिशात घातला. (IPL History)

6. ब्रॅड हॅडिन

या यादीत आणखी एक ऑस्ट्रेलियन खेळाडू यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिनचा समवेश आहे. मोर्तझाप्रमाणेच ब्रॅड हॅडिनने कोलकाता नाईट रायडर्ससाठी त्याचा एकमेव आयपीएल खेळ खेळला. हॅडिनने २०११ मध्ये ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध आयपीएलचा पहिला सामना खेळला. त्याने केकेआरकडून सलामीवीर फलंदाज म्हणून डावाची सुरुवात केली आणि २ चौकार आणि १ षटकारासह १८ धावांची जलद खेळी खेळली. सय्यद मोहम्मदने त्याला ५व्या षटकात बाद केले. गौतम गंभीर आणि युसूफ पठाणच्या खेळीच्या जोरावर केकेआरने २० षटकांत ५ बाद १७१ धावांपर्यंत पर्यंत मजल मारली. मात्र, ख्रिस गेलच्या ५५ चेंडूत १०२ धावांच्या तुफानी खेळीमुळे केकेआरने तो सामना ९ विकेट्सच्या मोठ्या फरकाने गमावला. (IPL History)

7. मायकेल नेसर

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मायकेल नेसर ज्याने दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले, तो २०१३ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी एकमेव आयपीएल सामना खेळला. त्याने RCB संघाविरुद्ध पदार्पण केले. पण दबावाखाली नेसरने ४ षटकांत ६२ धावा दिल्या. त्याच्यावर आरसीबीच्या डावातील शेवटच्या ३ षटकांपैकी २ षटके टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. समोर फलंदाजीसाठी एबी डिव्हिलियर्स आणि मोईसेस हेन्रिक्स होते. नेसरच्या त्या २ षटकांत ३३ धावा कुटल्या. याचबरोबर आरसीबीने २० षटकांत १९० धावांपर्यंत मजल मारली. तथापि, डेव्हिड मिलरच्या शतकामुळे पंजाब संघाने १२ चेंडू आणि ६ गडी राखून सामना जिंकला. पण सामना जिंकूनही नेसरला भविष्यातील सामन्यांमध्ये अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली नाही. (IPL History)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news