R Ashwin : दोन विकेट्स घेऊन आर. अश्विनची नव्या विक्रमाला गवसणी! | पुढारी

R Ashwin : दोन विकेट्स घेऊन आर. अश्विनची नव्या विक्रमाला गवसणी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि श्रीलंका (IND Vs SL) यांच्यातील मोहाली कसोटीत भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) विशेष कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याने नव्या विक्रमाची नोंद करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शनिवारी त्याने न्यूझीलंडचे माजी दिग्गज गोलंदाज सर रिचर्ड हॅडली यांना मागे टाकले आहे. आता रविचंद्रन अश्विनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ४३२ विकेट्स झाल्या आहेत.

मोहाली कसोटी सुरू होण्यापूर्वी रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) नावावर ४३० विकेट्स होत्या आणि सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो १२ व्या क्रमांकावर होता आणि आता तो एका स्थानाने पुढे ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विनने दोन विकेट घेतल्या, त्याने १३ षटकात २१ धावा देऊन या विकेट घेतल्या.

आर अश्विनच्या (R Ashwin) नावावर ८५ सामन्यात ४३२ विकेट्स आहेत, तर सर रिचर्ड हॅडली यांच्या नावावर ८६ सामन्यात ४३१ विकेट्स आहेत. अश्विनला या मालिकेत अनेक मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अश्विन टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम मोडू शकतो. यासाठी रविचंद्रन अश्विनला तीन विकेट्सची गरज आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स: : (Most Wickets in test cricket)

1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 800 विकेट्स
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708 विकेट्स
3. जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 640 विकेट्स
4. अनिल कुंबळे (भारत)- 619 विकेट्स
5. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563 विकेट्स
6. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – 537 विकेट्स
7. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – 519 विकेट्स
8. डेल स्टेन (द. आफ्रिका) – 439 विकेट्स
9. कपिल देव (भारत) – 434 विकेट्स
10. रंगना हेराथ (श्रीलंका) – 433 विकेट्स
11. रविचंद्रन अश्विन (भारत) – 432 विकेट्स
12. रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड) – 431 विकेट्स

दरम्यान, मोहाली कसोटीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ५७४ धावांवर डाव घोषित केला. भारताकडून रवींद्र जडेजाने १७५, ऋषभ पंतने ९६ धावा केल्या. त्यानंतर भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेचा डाव गडगडला. भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर त्यांच्या टॉप ऑर्डरचा टीकाव लागला नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या ४ बाद १०८ आहे. पाहुणा संघ अजूनही ४६६ धावांनी पिछाडीवर आहे.

Back to top button