पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ दोन दशकांनंतर पाकिस्तानात क्रिकेट मालिका खेळण्यासाठी पोहोचला आहे. कांगारू टीम पाकिस्तानात दाखल होताच या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, मात्र आता या दौऱ्यावरून वाद सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा क्रिकेटपटू अॅश्टन एगरला (Ashton Agar) पाकिस्तानात न येण्याची धमकी सोशल मीडियावर देण्यात आली आहे. ही धमकी अॅश्टन एगरची पार्टनर मॅडेलीनला पाठवण्यात आली आहे.
दोन दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियन संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तानातील खराब सुरक्षा परिस्थिती पाहता कांगारूंनी पाकिस्तानात क्रिकेट सामना किंवा मालिका खेळण्याचे धाडस केले नाही. आता संघ तिथे पोहोचला असताना अष्टपैलू अॅश्टन एगरला (Ashton Agar) जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. एगरच्या पत्नीला सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आल्याचे समजते. एगर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा भाग आहे. याआधी गेल्या वर्षीही न्यूझीलंडचा संघ अशाच धमकीनंतर दौरा सुरू होण्यापूर्वीच मायदेशी परतला होता.
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्टनुसार, एगरची पत्नी मॅडेलीनला धमकी मिळाली. अॅश्टनने पाकिस्तानात येऊ नये, जर तो पाकिस्तानात आला तर तो जिवंत परतणार नाही, अशा आशयाचा धमकीचा मजकूर आहे. त्यानंतर लगेचच क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला याबाबत कळवण्यात आले. ही धमकी कोणी दिली याचा याचा तपास सुरू आहे.
बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून हा मेसेज पाठवण्यात आल्याचे समजते. ऑस्ट्रेलियन संघ 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे, त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत. 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यानंतर पाकिस्तानमध्ये फक्त 6 कसोटी सामने आयोजित करण्यात आले होते.
ही धमकी गंभीर नसून, हा केवळ बनावट संदेश असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही आम्ही तपास सुरू केला आहे. खेळाडूंसाठी सुरक्षा योजना तयार करण्याचे काम सुरू आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 मार्चपासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. पहिला सामना पाकिस्तानातील रावळपिंडी येथे होणार आहे. ही तीन कसोटी सामन्यांची मालिका आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसीय आणि टी-20 सामनेही खेळवले जातील.