पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा भाग नाही. या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) संघात स्थान मिळाले. या संधीचे त्याने सोने केले. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना श्रेयसने चमकदार फलंदाजी केली.
श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) शानदार फलंदाजी करताना 57 धावांची नाबाद खेळी केली. त्याने इशान किशनसह 44 धावांची भागिदारी करून संघाला 199 धावांपर्यंत नेले. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ केवळ 137 धावांवर आटोपला आणि भारतीय संघाने पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 62 धावांनी जिंकला.
स्टार स्पोर्ट्सवरील चर्चात्मक कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांना भारताच्या T20 संघातील मधल्या फळीतील स्थानासाठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यात निवड करण्यास सांगण्यात आले. प्रत्युत्तरात, बांगर म्हणाले, 'विराट तिस-या क्रमांकावर फलंदाजी करतो. विराटच्या गैहजेरीत या क्रमांकावर कोण फलंदाजीस येईल असा प्रश्न सर्वांनाच आहे. पण टीम इंडिया विराटचा बॅकअप पर्याय म्हणून श्रेयस अय्यरला तयार करत आहे.'
'भारतीय क्रिकेट संघाकडे उपलब्ध प्रतिभावान सदस्यांचा संघ आता मजबूत होत आहे. श्रेयस अय्यरला सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जात असल्याने विराट कोहली एखाद्या सामन्यात दुखापत झाल्यास तो एक चांगला पर्याय असल्याचे स्पष्ट दिसते. तिस-या क्रमांकाची जागा अशी आहे जिथे संघ व्यवस्थापनाची नजर अय्यरवर आहे', असेही बांगर यांनी सांगितले.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल. त्यानंतर दोन्ही संघांदरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल. या मालिकेत विराट कोहली भारतीय संघात परतेल. पहिला कसोटी सामना हा विराटचा 100 वा कसोटी सामना असेल.