IPL 2022 मधील ‘अ’, ‘ब’ गटांची BCCI कडून घोषणा, MI-CSK ला केलं वेगळं! | पुढारी

IPL 2022 मधील ‘अ’, ‘ब’ गटांची BCCI कडून घोषणा, MI-CSK ला केलं वेगळं!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ ची तयारी वेगाने सुरू झाली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी आगामी हंगामासाठी सर्व १० संघांचा गट जाहीर केला. १० आयपीएल संघ प्रत्येकी १४ लीग सामने खेळतील. प्रत्येक संघ पाच संघांविरुद्ध दोनदा आणि उर्वरित चार संघांविरुद्ध फक्त एकदाच खेळताना दिसेल.

सर्व १० संघांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. संघांचे आयपीएल ट्रॉफी जिंकणे आणि अंतिम फेरीतील प्रवेशाच्या आधारावर दोन गटांची निर्मिती केली आहे. २०११ प्रमाणे यावेळीही १० संघांची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांना ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांना ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे.

ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघाला प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध दोन सामने खेळावे लागतील. सर्व १० संघ साखळी टप्प्यात १४-१४ सामने खेळतील. १४ पैकी ७ सामने त्यांच्या घरच्या मैदानावर, तर ७ इतर मैदानावर खेळवले जातील. संघ ५ संघांविरुद्ध दोन सामने खेळणार आहे. उर्वरित ४ संघांसोबत एक सामना खेळवला जाईल.

आयपीएलचा सलामीचा सामना २६ मार्चला तर स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाणार आहे. आज, शुक्रवारी (दि. २५) झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लीग स्टेजमधी सर्व ७० सामने महाराष्ट्रात खेळवले जातील. ५५ सामने मुंबईत तर १५ सामने पुण्यात होणार आहेत. वानखेडे स्टेडियम आणि डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर २० सामने, तर १५ सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवले जातील. उर्वरित १५ सामने पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.

उदाहरणार्थ, साखळी टप्प्यात मुंबई इंडियन्स संघ ‘अ’ गटातील कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि ‘ब’ गटातील प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळेल, तर सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे.

तर कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्या ‘अ’ गटातील मुंबई, राजस्थान, दिल्ली आणि लखनऊविरुद्ध २-२ सामने खेळेल. तसेच ‘ब’ गटातील हैदराबादविरुद्ध २ आणि चेन्नई बंगळुरू, पंजाब आणि गुजरात विरुद्ध १-१ सामना खेळणार आहे.

प्रत्येक संघाला १४-१४ सामने खेळावे लागतील..

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी जाहीर केले की, यावेळी सर्व १० संघ आयपीएल २०२२ मध्ये एकूण १४ लीग सामने खेळतील. ज्यामध्ये प्रत्येक संघ ५ संघांविरुद्ध दोन सामने आणि ४ संघांविरुद्ध १-१ सामना खेळेल. त्याचबरोबर या मोसमात एकूण साखळी सामन्यांसाठी ७४ सामने खेळवले जाणार आहेत.

Back to top button