

पुढारी ऑनलाईन : श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरनंतर मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवही (suryakumar yadav) श्रीलंकेविरुद्धच्या टी २० मालिकेतून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव हाताला दुखापत झाल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या ३ टी २० मालिकेत खेळताना दिसणार नाही. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २४ फेब्रुवारी खेळवला जाणार आहे.
बीसीसीआयने सूर्यकुमार (suryakumar yadav) आणि चहरच्या दुखापतीला अधिकृत दुजोरा दिला आहे. मात्र, संघातील बदलाबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. दीपकच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराहसह अनेक वेगवान गोलंदाज संघात आहेत. अशा स्थितीत मंडळ इतर कोणालाही संधी देईल याकडे लक्ष लागले आहे.
सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) आणि दीपक चहर यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी २० मालिकेतील भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ३१ वर्षीय सूर्यकुमारला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताबही देण्यात आला. दरम्यान, विंडिजविरुद्धच्या तिस-या आणि शेवटच्या टी २० सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. याचाच परिणाम तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार नाही. सुर्यकुमारची दुखापत किती गंभीर आहे आणि त्याला मैदानात परतण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप कळू शकलेले नाही. याआधी मंगळवारी (दि. २२) दीपक चहरलाही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी २० मालिकेतून वगळण्यात आले होते. दीपक चहरला मैदानात परतण्यासाठी ५ ते ६ आठवडे लागतील अशी माहिती मिळते आहे.
विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना श्रीलंकेविरुद्धच्या टी २० मालिकेतून आधीच ब्रेक देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सूर्यकुमारही बाहेर पडल्यानंतर भारतीय फलंदाजी कमकुवत झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, सूर्याच्या जागी वेंकटेश अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. त्याचबरोबर दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संजूचे संघात पुनरागमन झाले आहे. तर हुडाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी २० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी केली. त्याने ३ सामन्यांच्या टी २० मालिकेत १०७ धावा केल्या. तर अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत त्याने ३ सामन्यात १०४ धावा केल्या. कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर तिसऱ्या टी २० मध्ये सुर्याने ६५ धावांच्या खेळीत ७ षटकार मारले आणि व्यंकटेश अय्यरसोबत ९१ धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले.
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध १८ सदस्यीय टी २० संघाची घोषणा केली होती, आता २ खेळाडूंच्या दुखापतीनंतर संघात बदल करण्याची घोषणा होण्याची शक्यता नाकारली जात आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या टी २० मालिकेत संघात सामील होण्यासाठी कोणत्याही नव्या खेळाडूला बायो बबल आणि आयसोलेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, जी इतक्या कमी वेळात अशक्य होईल.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात २४ फेब्रुवारीपासून लखनऊमध्ये टी २० तीन सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील दुसरा सामना २६ आणि तिसरा सामना २७ फेब्रुवारीला धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे.