रोहित शर्मा म्हणाला, मालिका विजयापेक्षा अपेक्षित साध्य झाल्याचा आनंद

रोहित शर्मा म्हणाला, मालिका विजयापेक्षा अपेक्षित साध्य झाल्याचा आनंद

कोलकाता ; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका जिंकण्याचा आनंद आहेच. या मालिकेतून आम्हाला जे अपेक्षित साध्य होते ते मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केली.

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, प्रथम फलंदाजी असो किंवा धावांचा पाठलाग, सतत स्वतःला आव्हान देत राहणे हे संघासाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला सातत्याने कामगिरीत सुधारणा करत राहायची आहे. आमची मधली फळी नवीन आहे, त्यामुळे एकेक बॉक्स टिक करून पुढे जायचे आहे. धावांचा पाठलाग करण्याची ताकद या संघात आहे.

तो पुढे म्हणाला, तुम्ही प्रथम फलंदाजी करता तेव्हा वेगळी आव्हाने असतात. या खेळाडूंनी संघाला आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर काढले. हीच अपेक्षा मला त्यांच्याकडून होती; हे चांगले संकेत आहेत. वनडे मालिकेनंतर ट्वेंटी-20तही मधल्या फळीत झालेली सुधारणा ही सकारात्मक बाब आहे. आता वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यांसमोर आहे आणि या खेळाडूंनी त्यासाठी सज्ज असायला हवे, याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. मी प्रतिस्पर्धी संघाकडे पाहत नाही, तर एक संघ म्हणून आपण किती चांगली कामगिरी करू शकतो, हे पाहतो.

वनडे मालिकेपाठोपाठ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-20 मालिकेतही 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. सूर्यकुमार यादव व व्यंकटेश अय्यर यांच्या 91 धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला. हर्षल पटेलने 4 षटकांत 22 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. दीपक चहर (2-15), व्यंकटेश अय्यर (2-23) व शार्दूल ठाकूर (2-33) यांनीही कमाल गोलंदाजी केली. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने 47 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकार खेचून 61 धावा केल्या आणि रोवमन शेफर्डने 29 धावा करताना संघर्ष केला.

तत्पूर्वी, श्रेयस अय्यर (25) व इशान किशन (34) यांनी टीम इंडियाची गाडी रुळावर आणल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने चांगली फटकेबाजी केली.

आयसीसी टी-20 क्रमवारी; भारत अव्वल स्थानी

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळविल्यानंतर भारत सोमवारी आयसीसी पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. यामुळे पहिल्या स्थानी असलेल्या इंग्लंडची घसरण झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची रेटिंग इंग्लंडप्रमाणे 269 अशी आहे. भारताने यापूर्वी 2016 मध्ये अव्वल स्थान मिळवले होते. भारत आणि इंग्लंड दोघांचे 39 सामन्यांत 269 रेटिंग आहे; पण भारताचे 10,484 गुण आहेत, जे इंग्लंडपेक्षा (10,474) 10 गुणांनी अधिक आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार पाकिस्तान (रेटिंग 266), न्यूझीलंड (255) आणि दक्षिण आफ्रिका (253) यांचा अव्वल पाच जणांमध्ये समावेश आहे, तर ऑस्ट्रेलिया (249) सहाव्या स्थानी आहे. वेस्ट इंडिज (235) सातव्या स्थानावर आहे. यानंतर अफगाणिस्तान (232), श्रीलंका (231) आणि बांगलादेश (231) यांचा क्रमांक लागतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news