Venkatesh Iyer : व्यंकटेश अय्यरकडून हार्दिक पंड्याचा पत्ता कट?

Venkatesh Iyer : व्यंकटेश अय्यरकडून हार्दिक पंड्याचा पत्ता कट?
Venkatesh Iyer : व्यंकटेश अय्यरकडून हार्दिक पंड्याचा पत्ता कट?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सातत्याने यशाची नवीन शिखरे पादाक्रांत करत आहे. विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. नंतर त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही काढून टाकण्यात आले. त्यामुळे रोहितकडे टी-२० आणि वनडे संघाच्या नियमित कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दोन टी २० मालिका आणि एक वनडे मालिका खेळली आहे आणि तिन्ही मालिकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा क्लीन स्वीप झाला आहे. यामध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (टी २०) ३-० ने आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (वनडे आणि टी २०) ३-० या मालिका विजयांचा समावेश आहे. (Venkatesh Iyer)

व्यंकटेश अय्यरचा मॅच विनर म्हणून उदय..

कर्णधार बनल्यानंतर रोहितने सातत्याने नवीन खेळाडूंना संधी दिली आणि त्याने टीम इंडियाचे बस्तान बसवले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अष्टपैलू व्यंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) कामगिरी काही खास नव्हती, पण तरीही रोहित त्याला संधी देत ​​राहिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत तर व्यंकटेश मॅच विनर म्हणून उदयास आला. त्याने विंडीजविरुद्धच्या शेवटच्या टी-२०मध्ये जबरदस्त फलंदाजी केली. तर गोलंदाजी करताना किरॉन पोलार्ड आणि जेसन होल्डरसारखे दोन बळीही मिळवले.

व्यंकटेश मोठे फटके मारण्यात माहिर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी २० मालिकेत व्यंकटेश (Venkatesh Iyer) हा भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने तीन सामन्यांत ९२ च्या सरासरीने आणि १८४ च्या स्ट्राईक रेटने ९२ धावा केल्या. शेवटच्या टी २० मध्ये त्याने सूर्यकुमार यादवसोबत ३७ चेंडूत ९१ धावांची भागीदारी करून भारताला १८४ धावांपर्यंत नेले. व्यंकटेश मोठे फटके मारण्यात माहिर आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्येच आपल्या क्षमतेची सर्वांना जाणीव करून दिली आहे.

हार्दिक पंड्याच्या जागी व्यंकटेश संघात..

या वर्षी ऑस्ट्रेलियात होऊ घातलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी व्यंकटेश अय्यरची वाटचाल महत्त्वाची आहे. कांगारुंच्या भूमीवर भारताला वेगवान गोलंदाजी करणा-या अष्टपैलू खेळाडूची गरज भासणार आहे. व्यंकटेश यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंड्याची कामगिरी निराशाजनक राहिली. या जागतिक स्पर्धेनंतर बीसीसीआयनेही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. पण त्याचवेळी व्यंकटेश हा टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असेल याकडे निवडकर्त्यांनी लक्ष दिल्याचेही बोलले जात आहे. त्यातच व्यकटेशही निवडकर्त्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे.

व्यंकटेशने आपली कामगिरी अशीच सुरू ठेवली, तर हार्दिक पंड्याचा संघातून पत्ता कट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. व्यंकटेशमध्ये एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची क्षमता आहे. यासोबतच सलामीवीरापासून ते खालच्या फळीपर्यंत कोणत्याही फलंदाजीच्या क्रमवारीत तो चमकदार कामगिरी करू शकतो. रोहित कर्णधार होताच आणि व्यंकटेशची संघात एन्ट्री होताच वेगवान अष्टपैलू खेळाडूची सर्वात मोठी समस्या जवळपास दूर झाल्याचे चित्र आहे.

सूर्यकुमारच्या रुपात सापडला भरवशाचा फलंदाज

टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या रूपाने मधल्या फळीतील एक भरवशाचा फलंदाज मिळाला आहे. श्रेयसपेक्षा त्याला प्राधान्य देणे योग्य का आहे, हे त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत स्पष्ट केले. विंडीजविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमारने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने तीन सामन्यांच्या तीन डावात ५३.५० च्या सरासरीने आणि १९४.५४ च्या स्ट्राईक रेटने १०७ धावा केल्या. त्यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. सूर्यकुमार तंदुरुस्त राहिल्यास त्याची टी-२० विश्वचषकाच्या संघात निवड होईल यात शंका नाही.

इशान किशनला सुधारणा करणे गरजेचे..

यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन यंदाच्या आयपीएल मेगा लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र विंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील त्याची कामगिरी खूपच निराशाजनक होती. त्याला तीन डावात २३.६६ च्या सरासरीने आणि ८५.५४ च्या स्ट्राईक रेटने फक्त ७१ धावा करता आल्या. कर्णधार रोहितचा इशानवर खूप विश्वास आहे. जर त्याला टी २० विश्वचषक संघात आपले स्थान निश्चित करायचे असेल तर त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे. केएल राहुलच्या पुनरागमनानंतर इशानचे प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवणे तितकेच कठीण होऊ शकते. त्याची अशीच कामगिरी सुरू राहिल्यास त्याला संघात स्थान मिळवणेही कठीण होईल.

रवी बिश्नोईचा धक्कादायक परफॉर्मन्स..

कर्णधार रोहितने विंडिज विरुद्धच्या टी २० मालिकेत युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला संधी दिली. रवीने सुद्धा या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. त्याने तीन सामन्यांमध्ये ६.३३ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आणि तीन बळीही घेतले. तो भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या पुनरागमनामुळे भारताचे फिरकी आक्रमण रंजक होणार आहे.

वेगवान गोलंदाजीलाही धार…

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भुवनेश्वर कुमारची कामगिरी भलेही खराब असेल, पण वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याला दीपक चहरनेही चांगली साथ दिली. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनानंतर भारताची वेगवान गोलंदाजी मजबूत होईल. टीम इंडियाकडे शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षल पटेल आणि बॅकअप म्हणून मोहम्मद सिराज आणि आवेश खानसारखे गोलंदाज आहेत. हर्षल पटेलनेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली होती. या मालिकेत तो भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने तीन सामन्यांत पाच बळी घेतले. त्याचा इकॉनॉमी रेट ८..७५ इतका होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news