कराची ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स फॉकनरने पैसे न मिळाल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगला रामराम ठोकला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) कराराची रक्कम न दिल्याने त्याने हा निर्णय घेतला. जेम्स फॉकनर घरी परतण्यासाठी विमानतळावर जात असताना, तो खूप रागावलेला दिसला. तो इतका संतापला की त्याने विमानतळावर जाण्यापूर्वी लॉबीच्या बाल्कनीतून बॅट आणि हेल्मेट फेकले, जे झुंबरावर जाऊन अडकले. नुकसानग्रस्त झुंबराचे फोटो सोशल मीडियावर वार्यासारखे व्हायरल झाले आहेत.
फॉकनरने यापूर्वी पीसीबीवर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. त्याने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले, मी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. दुर्दैवाने मला शेवटच्या दोन सामन्यांतून माघार घ्यावी लागली. पीसीबीने माझे निश्चित मानधन न दिल्यामुळे मला हे पाऊल उचलावे लागले आहे. मी संपूर्ण कालावधीसाठी येथे राहिलो; परंतु बोर्ड माझ्याशी खोटे बोलत राहिला.
फॉकनरने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले, लीग सोडताना दुःख होत आहे, कारण मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये परत आणण्यासाठी मदत करायची होती. येथे खूप तरुण प्रतिभा आहे; परंतु मला पीसीबी आणि पीएसएलने ज्या प्रकारे वागणूक दिली गेली ती अपमानास्पद आहे. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना माझी भूमिका समजली आहे.
जेम्स फॉकनर पीएसएल 2022 मध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सचा भाग होता. या मोसमात त्याने सहा सामन्यांत सहा विकेटस् घेतल्या आहेत. पीसीबीने फॉकनरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान सुपर लीगमध्ये फॉकनरला बंदी घालण्यात आली आहे.