Virat Kohli : ‘विराट’चे पोस्टर पाकिस्तानच्या मैदानावर झळकले! | पुढारी

Virat Kohli : ‘विराट’चे पोस्टर पाकिस्तानच्या मैदानावर झळकले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) ७१ व्या शतकाची आता पाकिस्तानातही प्रतीक्षा आहे. कोहलीच्या बॅटमधून धावा निघत आहेत; पण तो आपल्या डावाचे शतकात रूपांतर करू शकलेला नाही. पाकिस्तान सुपर लीग (PSL) दरम्यान लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये एका क्रिकेट चाहत्याने कोहलीचे पोस्टर झळकावून ‘मला पाकिस्तानच्या मैदानावर तुला शतकी खेळी साकारताना पहायचे आहे,’ असे या पोस्टरवर लिहिले होते. तर सामन्यादरम्यान अनेक चाहते रोहित शर्माचेही पोस्टर हातात घेऊन क्रिकेटचा आनंद घेताना दिसले.

विराटने (Virat Kohli) त्याचे शेवटचे शतक बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट सामन्यात झळकावले होते. तो सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियममध्ये नोव्हेंबर २०१९ दरम्यान खेळण्यात आला होता. विराटने त्या सामन्यात १९४ चेंडूत १३६ धावांची शानदार खेळी केली होती. यानंतर विराटने आतापर्यंत ६९ डाव खेळले आहेत; पण शतकी खेळीची त्‍याची प्रतीक्षा काही संपलेली नाही.

पाकिस्तान सुपर लीगच्या ज्या सामन्यात विराटचे (Virat Kohli) चाहते दिसले, त्या सामन्यात रिझवान आणि रुसो यांनी सर्वोत्तम खेळी केली. क्वेटा आणि मुलतान यांच्यात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुलतान सुलतान्सचा कर्णधार रिझवानने ५४ चेंडूत नाबाद ८३ तर रुसोने अवघ्या २६ चेंडूत ७१ धावा कुटल्या. मुलतानने २० षटकांत ३ बाद २४५ धावा केल्या. या दोघांशिवाय सलामीवीर शान मसूदनेही ३८ चेंडूत ५७ धावा केल्या.

प्रत्युत्तरात क्वेटा ग्लॅडिएटर्सचा डाव १५.५ षटकांत १२८ धावांवर आटोपला आणि मुलतानने ११७ धावांनी सामना जिंकला. मसूद आणि रिझवान फलंदाजी करत असताना कॅमेऱ्यात विराटचे पोस्टर झळकवणारा एक चाहता दिसला.

टीम इंडियाची २००८ पासून पाकिस्तान दौऱ्याकडे पाठ..

२००८ मध्ये टीम इंडियाने अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता. मुंबईवरील दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने पाकिस्‍तान ‘क्रिकेट’ संबंध ताेडले. आयसीसी (ICC) स्पर्धेतच दोन्ही देश आमनेसामने येतात. दोन्ही देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. तेव्हा पाकिस्तानचा संघ भारताच्या दौ-यावर आला होता. पाकिस्तानच्या संघाने ती मालिका २-१ ने जिंकली होती. तर टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. २०२१ मध्ये टी २० विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. त्या सामन्यात पाकिस्तान संघाने विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच टीम इंडियाचा पराभव केला. आता हे दोन्ही संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भिडणार आहेत. हा सामना यावर्षी २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Back to top button