Rohit Sharma : विराटची पाठराखण करत रोहित शर्मा मीडियावरच भडकला | पुढारी

Rohit Sharma : विराटची पाठराखण करत रोहित शर्मा मीडियावरच भडकला

कोलकाता : पुढारी ऑनलाईन : Rohit Sharma : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात उद्या १६ फेब्रुवारीला तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. भारताने याआधी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव केला होता. आता टीम इंडियाला टी-२० मालिकेतही वेस्ट इंडिजचा ३-० ने क्लीन स्विप करायचा आहे. १६, १८ आणि २० फेब्रुवारीला टी-२० मालिकेचे सामने होणार आहेत. तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतील सर्व सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जातील. पहिल्या टी २० सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होणार असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, पहिल्या टी २० सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) माध्यमांशी संवाद साधला. सध्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहली फलंदाजीत अपयशी ठरत असून त्याच्या खराब फॉर्मचीही जोरदार चर्चा आहे. याच मुद्यावरून रोहित शर्माला प्रश्न विचारला असता तो मीडियावर भडकला. त्याने विराटची पाठराखण केली. ‘तुम्ही शांत राहाल तर सर्व काही ठीक होईल. विराट कोहलीला दडपण कसे हाताळायचे हे माहित आहे आणि तो लवकरच फॉर्ममध्ये येईल. सध्या विराटची मानसिकता खूप चांगली आहे,’ असं म्हणत रोहितने मीडियावरच निशाणा साधला.

विराट कोहली गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांत तो ८, १८ आणि ० धावा करू शकला. रोहितने (rohit sharma) मंगळवारी (दि. १५) माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘मला वाटतं तुम्ही लोक (माध्यम) थोडा वेळ शांत बसलात तर विराट कोहली बरा होईल आणि सर्व गोष्टींची काळजी घेतली जाईल. तो सध्या योग्य मानसिकतेत आहे आणि तो एका दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग आहे, जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतका वेळ घालवलेल्या एखाद्या व्यक्तीने दबावाची परिस्थिती कशी हाताळायची हे त्याला माहीत आहे. मला वाटते की हे सर्व तुमच्यापासून सुरू झाले आहे, जर तुम्ही यावर थोडे मौन पाळले तर सर्व काही ठीक होईल.’

टीम कॉम्बिनेशनवर रोहितची प्रतिक्रिया..

पत्रकार परिषदेत विराटसोबतच रोहितने टी २० साठी टीम कॉम्बिनेशनबद्दलही चर्चा केली. तो म्हणाला, मी टी २० सामन्यांमध्ये कोणताही प्रयोग करण्याच्या बाजूने नाही आणि करणारही नाही. ‘प्रयोग’ हा शब्द अगदी ओव्हर-रेट केलेला आहे, असे त्यांने सांगितले.

Back to top button