IPL 2022 : आयपीएल लिलावात नवीन चेहरे होणार मालामाल | पुढारी

IPL 2022 : आयपीएल लिलावात नवीन चेहरे होणार मालामाल

बंगळुरु : आयपीएल (IPL 2022) महालिलावासाठी आता फक्त एकच दिवस उरला आहे. शनिवारी व रविवारी बंगळूरमध्ये होणार्‍या लिलावात जवळपास दोनशे खेळाडूंची विक्री होण्याची शक्यता आहे. आपला संघ भक्कम व्हावा, यासाठी (IPL 2022) अनेक नामवंत व दिग्गज खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रँचाईजीमध्ये चढाओढ रंगणार असली तरी भविष्यकालीन विचार करता काही होतकरू तरुण खेळाडू आपल्या तंबूत आणण्यासाठी प्रयत्नशील असतील.

श्रीकर भरत : श्रीकर भरतला भारतीय संघात निवडण्यात आले होते; परंतु त्याला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. तो आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून खेळत होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून आरसीबीला विजय मिळवून दिला होता. भरतने हजारे चषक स्पर्धेत 156 आणि 161 धावा केल्या होत्या.

राज बावा : वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या अंडर-19 वर्ल्डकपमधील विश्वविजेत्या भारतीय संघातील हीरो राज बावा हा यंदाच्या लिलावाचे विशेष आकर्षण असणार आहे. वेगवान गोलंदाजी आणि भक्कम फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. विश्वचषकात त्याने युगांडाविरुद्ध 162 धावांची खेळी केली होती. शिवाय अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडचे कंबरडे मोडले होते.

दर्शन नळकंडे : विदर्भ संघाचा वेगवान गोलंदाज दर्शन नळकंडे हा पंजाब किंग्ज संघाचा हिस्सा होता. त्याने आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळले असून एकदा पाच विकेट आणि एकदा 4 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. यापैकी पाच विकेट त्याने केवळ 9 धावांत घेतल्या होत्या. मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने कर्नाटकविरुद्ध 4 चेंडूत 4 विकेट घेतल्या होत्या.

जीतेश शर्मा : विदर्भाचा यष्टीरक्षक फलंदाज जीतेश शर्मा हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू होता. परंतु, त्याला मैदानावर संधी मिळाली नाही. गेल्या मुश्ताक अली स्पर्धेत त्याने 7 डावांत 53.50 च्या सरासरीने 235 च्या स्ट्राईक रेटने 214 धावा केल्या आहेत. त्याने स्पर्धेत 18 षटकार ठोकले आहेत.

तिलक वर्मा : 19 वर्षीय तिलक वर्मा 2020 मध्ये अंडर-19 वर्ल्डकप संघातून खेळला होता. त्याने हैदराबादसाठी आतापर्यंत 15 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 143 च्या स्ट्राईक रेटने 381 धावा आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच तो पार्टटाईम गोलंदाजीही करतो.

Back to top button