अहमदाबाद; वृत्तसंस्था : नवीन कर्णधार रोहित शर्माच्या उपस्थितीत भारतीय संघ रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध (IND Vs WI) होणार्या एकदिवसीय मालिकेत चांगल्या सुरुवातीसह मध्यक्रमातील समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल. मालिकेतील पहिला सामना भारतासाठी ऐतिहासिक एक हजारावा एकदिवसीय सामना असणार आहे. भारतीय संघाने 2023 विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या तयारीलादेखील सुरुवात करेल.
दक्षिण आफ्रिकन संघाकडून त्यांच्या घरात पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघ आता नवीन एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मासोबत लय मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहित व द्रविड जोडी पुढील काही महिन्यांसाठी 50 षटकांच्या प्रकाराकरिता भारतीय संघाची रणनीती ठरवतील. त्यामुळे रविवारी सुरू होणार्या मालिकेत अडचणींचा सामना करत असलेला मध्यक्रम योग्य करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न केले जातील.(IND Vs WI)
मालिकेसाठी सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांना निवड समितीला आकर्षित करण्याची संधी आहे. यासोबतच विराट कोहली कशी कामगिरी करेल, यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने मध्यक्रमात व्यंकटेश अय्यरला संधी दिली होती; पण हा प्रयोग अयशस्वी ठरला. (IND Vs WI)
गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास स्पिनर कुलदीप यादवचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे आणि युजवेंद्र चहलसोबत तो अंतिम अकराजणांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. कुलदीपने आपला शेवटचा एकदिवसीय सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. संघ व्यवस्थापनाने युवा गोलंदाज रवी बिश्नोईलादेखील संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याला संधी मिळते का, हे पाहावे लागेल. जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर सांभाळू शकतो. ठाकूरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय लढतीत फलंदाजीनेदेखील चमक दाखवली होती. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान यांनादेखील चमक दाखवण्याची संधी आहे.
वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकून येथे पोहोचला आहे. संघात निकोलस पुरनदेखील आहे. आयपीएल लिलावापूर्वी तो संघांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल; पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळणेदेखील गरजेचे आहे. कर्णधार कायरन पोलार्ड आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डर यांच्या कामगिरीवर नजरा असतील.
भारतीय संघ ठरणार पहिला (IND Vs WI)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरल्यावर टीम इंडिया आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करेल. भारतीय संघाचा हा 1,000 वा वन-डे सामना असेल आणि ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला संघ ठरेल. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया (958) आणि पाकिस्तान (936) या दोन संघांनी आतापर्यंत 900 सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय संघाने आपला पहिला वन-डे 48 वर्षांपूर्वी 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध लीडस् येथे खेळला होता.
विराटचा वारसा पुढे चालवीन : रोहित
विराट कोहलीने कर्णधारपद सोडले असले, तरी त्याचे संघात विशेष महत्त्व असणार आहे, असे रोहित म्हणाला. विराटने कर्णधार असताना ज्या गोष्टी केल्या, त्या चांगल्याच होत्या; पण याचा अर्थ असा नाही की, मी नवीन कर्णधार असल्यामुळे त्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. उलट सध्या काहीही बदल आणण्याची गरज नाही. जेव्हा विराट कोहली कर्णधार होता त्यावेळी मी त्या संघाचा उपकर्णधार होतो. त्यामुळे विराटने ज्या यशस्वी पद्धतीने नेतृत्व केले त्याचप्रकारे मीदेखील त्याचा वारसा पुढे सुरू ठेवेन. मी नेतृत्व करत असताना काही वेळा अशी परिस्थिती येईल जेव्हा आम्हाला थोडासा बदल करावा लागेल, त्यावेळी आम्ही नक्कीच बदलाचा विचार करू, असे रोहित म्हणाला.
रोहितबरोबर ईशान करणार डावाची सुरुवात
शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या जोडीदाराबद्दल सर्वांनाच प्रश्न पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर कर्णधार रोहित शर्माने दिले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्फोटक डावखुरा सलामीवीर ईशान किशन डावाची सुरुवात करेल, असे खुद्द रोहित शर्माने सांगितले आहे. ईशान किशनला फक्त वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले होते. तो वन-डे संघाचा भाग नव्हता. मात्र, टीम इंडियातील महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने ईशानचा समावेश वन-डे संघातही करण्यात आला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांची प्रमुख सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यातच के. एल. राहुल पहिली वन-डे खेळाणार नसल्याचे समोर आले होते. त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसून, दुसर्या सामन्यापासून तो उपलब्ध आहे. सामन्यापूर्वी आभासी पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, मयंक अग्रवालचा अद्याप क्वारंटाईन कालावधी संपलेला नाही. त्यामुळे माझ्यासोबत सलामीला मैदानात उतरण्यासाठी ईशान किशन हा एकमेव पर्याय समोर आहे.
आज पहिला वन-डे