Ishan Kishan : रोहित शर्मासोबत इशान किशन ओपनिंगला येणार!

Ishan Kishan : रोहित शर्मासोबत इशान किशन ओपनिंगला येणार!
Ishan Kishan : रोहित शर्मासोबत इशान किशन ओपनिंगला येणार!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs WI) रोहित शर्माच्या जोडीदाराबद्दल सर्वांनाच प्रश्न पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर कर्णधार रोहित शर्माने दिले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्फोटक डावखुरा सलामीवीर इशान किशन डावाची सुरुवात करेल असे खुद्द रोहित शर्माने सांगितले आहे.

दरम्यान, ईशान किशनला फक्त वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले होते. त्याला वनडे संघातून वगळण्यात आले होते. मात्र, टीम इंडियातील महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने इशानचा समावेश वनडे संघातही करण्यात आला.

इशान किशनने गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत दोन वनडे सामने खेळले आहेत. त्याने आपल्या पहिल्या सामन्यात ५९ धावा केल्या, ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या देखील आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात फारसे खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे इशान किशनला आपले स्थान निश्चित करण्याची उत्तम संधी असेल.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरल्यावर टीम इंडिया आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करेल. भारतीय संघाचा हा १००० वा वनडे सामना असेल आणि ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला संघ ठरेल. भारताशिवाय ऑस्ट्रेलिया (९५८) आणि पाकिस्तान (९३६) या दोन संघांनी आतापर्यंत ९०० सामन्यांचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय संघाने आपला पहिला वनडे ४८ वर्षांपूर्वी १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे खेळला होता. त्या सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडने चार गडी राखून पराभव केला होता.

रोहित शर्मा म्हणाला, 'आम्हाला जास्त बदलाची गरज नाही. आपल्याला फक्त वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि मालिका गमावल्यामुळे घाबरण्याची गरज नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून आम्ही खूप काही शिकलो आणि एक संघ म्हणून आम्ही ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करू.'

वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांची प्रमुख सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यातच केएल राहुल पहिली वनडे खेळाणार नसल्याचे समोर आले होते. त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसून तो दुस-या सामन्यापासून उपलब्ध आहे.

सामन्यापूर्वी आभासी पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, मयंक अग्रवालचा अद्याप क्वारंटाईन कालावधी संपलेला नाही. त्यामुळे माझ्यासोबत सलामीला मैदानात उतरण्यासाठी इशान किशन हा एकमेव पर्याय समोर आहे.

कोरोनामुळे दोनच शहरांमध्ये स्पर्धा होणार…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे आणि टी २० मालिकांचे सामने वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जाणार होते, परंतु कोरोना विषाणूची वाढती रुग्णसंख्या पाहता सामन्यांची ठिकाणे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news