नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : भारताचा निर्धारित षटकाच्या सामन्यातील नवीन कर्णधार रोहित शर्मा याच्यासमोर अगामी 24 महिन्यांत होणार्या टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत फिट राहण्याचे आव्हान असणार आहे, असे माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर यांनी सांगितले. विराट कोहलीने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे ती जबाबदारी देण्यात आली. नंतर कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवून ही जबाबदारी रोहितकडे देण्यात आली. निर्धारित षटकांच्या संघासाठी एकच कर्णधार आहे, जी चांगली गोष्ट आहे आणि रोहितकडे ही जबाबदारी आहे, असे आगरकर यांनी सांगितले.
टी-20 विश्वचषक स्पर्धा वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत, तर एकदिवसीय विश्वचषक पुढील वर्षी होईल. आगरकर पुढे म्हणाले की, रोहितसमोर फिट राहण्याचे आव्हान असेल आणि सफेद चेंडूच्या क्रिकेटमध्ये विश्वचषकापर्यंत सर्व स्पर्धा खेळण्याचा त्याचा प्रयत्न असेल. विराटची फिटनेस ही मजबूत बाजू होती व त्यापूर्वी धोनीदेखील फिट होता. रोहित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळू शकला नाही. यानंतर त्याला एकदिवसीय मालिकेतूनदेखील बाहेर पडावे लागले. कारण, तो पूर्णपणे फिट नव्हता. रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत वारंवार त्रास देत आहे, त्यामुळे 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसह निर्धारित षटकांचे सामने त्याला खेळता आले नव्हते; पण रोहित वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संघाचे नेतृत्व करेल.
हेही वाचलतं का?