

पुढारी ऑनलाईन डेस्क
देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळूहळू मंदावत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख २७ हजार ९५२ नवे रुग्ण आढळून आले. तर १,०५९ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २ लाख ३० हजार ८१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात कोरोनाचे १३ लाख ३१ हजार ६४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट ७.९८ टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ५ लाख १ हजार ११४ वर पोहोचला आहे.
याआधीच्या दिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. गुरूवारी १ लाख ४९ हजार ३९४ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, १ हजार ७२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, २ लाख ४६ हजार ६७४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशात १ लाख ७२ हजार ४३३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. या तुलनेत गुरूवारी दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९५.३९ टक्क्यांवर पोहचला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ९.२७ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर १२.०३ टक्के नोंदवण्यात आला होता.
कोरोना महारोगराईविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानादरम्यान देशाने शुक्रवारी आणखी एक मैलाचा दगड गाठला. अवघ्या महिन्याभरातच देशातील १५ ते १८ वयोगटातील ६५ टक्के मुलांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वात मोठे लसीकरण अभियान नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे, अशी भावना मांडविया यांनी व्यक्त केली आहे. देशात ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणास सुरूवात करण्यात आली होती.
देशात गेल्या आठवड्याभरात कोरोना मृत्यूच्या आकड्याने उच्चांक गाठला आहे. जगातील सर्वाधिक कोरोनामृत्यू झालेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. देशात पाच लाखांहून अधिक कोरोनामृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत सर्वाधिक ९.१ लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझील मध्ये ६.३ लाख मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.चौथ्या स्थानावर असलेल्या रशियात जवळपास ३.३ लाख नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी उपसचिव अथवा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची यासंबंधी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पीडित कुटुंबियांपर्यंत आर्थिक मदत योग्यरित्या पोहचण्यासंबंधीची देखरेख तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण (एसएलएसए) सोबत मिळून पीडितांपर्यंत आर्थिक मदत पोहचवण्याचे कार्य नोडल अधिकाऱ्यांमार्फत करावे,असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
राज्य ते तालुका स्तरावर कार्यरत विधी सेवा प्राधिकरणाने देखील या कार्यात पीडित अर्जदार तसेच योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यात मदत करावी, असेही न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. एका आठवड्याचा आत संबंधित एसएलएसए ला नाव, पत्ता तसेच मृत्यूप्रमाण पत्रासह अनाथांसंबंधी संपूर्ण विवरण देण्याचे निर्देश देखील खंडपीठाने दिले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले. अर्जदारांकडून करण्यात आलेल्या अर्जात चुका झाल्यात त्याला रद्द करू नये. तांत्रिक अडचणी असल्यास ते पुर्ववत करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर जास्तीत जास्त १० दिवसांच्या आत पीडितांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राज्य विधी सेवा प्राधिकरणाने ज्यांनी अद्यापही कुठल्याही कारणाने आर्थिक मदतीसाठी संपर्क केला नाही अशांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.