मिताली राज वन-डेमध्ये अव्वल | पुढारी

मिताली राज वन-डेमध्ये अव्वल

दुबई ; वृत्तसंस्था : भारतीय कर्णधार मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 762 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचली आहे. तर, स्मृती मानधनादेखील नवव्या स्थानासह अव्वल 10 जणांमध्ये सहभागी आहे.

फलंदाजांच्या यादीत मिताली राज नवव्यादा अव्वल स्थानी पोहोचली आहे. अव्वल स्थानी असणारी वेस्ट इंडिज संघाची कर्णधार स्टेफानी टेलरची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.

गोलंदाजांच्या यादीत झुलन गोस्वामी पाचव्या स्थानी असून, अव्वल दहा जणांमध्ये असणारी ती एकमात्र भारतीय गोलंदाज आहे. तर, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दीप्ती शर्मा दहाव्या स्थानी आहे.

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या क्रमवारीत भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधना तिसर्‍या स्थानी आहे. तिने इंग्लंड विरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात 70 धावांची खेळी केली. मंगळवारच्या साप्ताहिक अपडेटमध्ये वेस्ट इंडिजची कर्णधार टेलरला 30 गुणांचे नुकसान झाले आहे.

वेस्ट इंडिज संघाने पाकिस्तानला पाच सामन्यांच्या मालिकेत 3-2 असा विजय मिळवला. टेलरला साप्ताहिक रँकिंगदरम्यान दोन वेळेला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये तिने 49 आणि 21 धावांची खेळी केली.

Back to top button