Sri Lanka vs India : दीपक चाहर ची झुंजार खेळी, भारताचा मालिका विजय | पुढारी

Sri Lanka vs India : दीपक चाहर ची झुंजार खेळी, भारताचा मालिका विजय

कोलंबो; पुढारी ऑनलाईन

भारत आणि श्रीलंका ( Sri Lanka vs India ) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक चाहरच्या झुंजार ६९ धावांच्या जोरावर श्रीलंकेचे २७६ धावांचे आव्हान पार केले. भारताने दुसरा सामना जिंकून मालिकाही खिशात घातली.

श्रीलंकेचे २७६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने तीन चौकार मारत धडाक्यात सुरुवात केली. मात्र हरसंगाने त्याचा १३ धावांवर त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला.

भारताची मधली फळी ढासळली ( Sri Lanka vs India )

पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर आलेल्या इशान किशनलाही फार काळ तग धरता आला नाही. अवघ्या १ धावेवर त्याचा रजिताने त्रिफळा उडवला. ३९ धावांवर भारताचे दोन फलंदाज माघारी गेल्यानंतर कर्णधार शिखर धवन आणि मनिष पांडे यांनी डाव सारवण्याचा प्रयत्न केला.

या दोघांनी 10 व्या षटकात भारताच्या ६० धावा धावफलकावर लावल्या. ही जोडी जमली असे वाटत असतानाच हरसंगाने कर्णधार धवनला २९ धावांवर बाद करुन भारताला मोठा धक्का दिला. धवन बाद झाल्यानंतर पांडे आणि सूर्यकुमार यादवने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

हार्दिक पांड्याकडून निराशा 

या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचत भारताला शंभरी पार करुन दिला. मात्र त्यानंतर मनिष पांडे ३७ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला शनकाने भोपळाही फोडण्याची संंधी दिली नाही. पांड्या बाद झाल्याने भारताची अवस्था १८ षटकात ५ बाद ११६ अशी झाली.

सूर्यकुमार बाद, पराभवाचे ढग दाटले ( Sri Lanka vs India )

Sri Lanka vs India
सूर्यकुमारची झुंजार अर्धशतकी खेळी

निम्मा संघ माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने कृणाल पांड्याच्या साथीने भागीदारी रचण्यास सुरुवात केली.

या दोघांनी सावध फलंदाजी करत भारताला १५० चा टप्पा पार करुन दिला. दरम्यान, सूर्यकुमार यादवने आपले अर्धशतक पूर्ण केले.

ही जोडी भारताला संकटातून बाहेर काढणार असे वाटत असतानाच  संदकनने भारताला मोठा धक्का दिला. त्याने चांगली फलंदाजी करत असलेल्या सूर्यकुमारलाच ( ५३ ) बाद केले.

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर कृणाल पांड्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, हसरंगाने त्याला ३५ धावांवर बाद करुन भारताला सातवा धक्का दिला.

दीपक चाहरची फलंदाजीत चमक 

कृणाल बाद झाल्यानंतर श्रीलंकेची सामन्यावरची पकड मजबूत झाली. पण, दीपक चाहर आणि भुनवेश्वर कुमार यांनी अजून सामना संपला नसल्याचे दाखवून दिले. दीपक चाहरने चिवट फलंदाजी करत सामना बॉल टू रन असा आणला.

या दोघांनी हळूहळू भागीदारी रचत सामन्यात रंगत आणली. चाहर संयमीत जोखीम घेत खेळत होता तर भुवनेश्वरने एक बाजू लावून धरली होती. दरम्यान, दीपक चाहरने एकदिवसीय क्रिकेटमधली आपले पहिले वहिले अर्धशतक पूर्ण केले.

भानुकाकडून भूवीला जीवनदान 

दुसऱ्या बाजूने भुवनेश्वर कुमार कोणतीही जोखीम न घेता चाहरला फक्त साथ देत होता. यामुळे श्रीलंकेची विकेट घेऊन सामन्याचे पारडे आपल्याकडे झुकवण्याच्या इराद्यावर पाणी फिरले.

त्यातच विकेटकिपर भानुकाने चमीराच्या गोलंदाजीवर भुवनेश्वरला जीवनदान दिले.त्यामुळे श्रीलंकेचा पाय अणखीच खोलात गेला. आता सामना बॉल टू रन आला होता.

सामना शेवटपर्यंत नेत विजयी मोहर उमटवली

भारताला विजयासाठी २० चेंडूत १८ धावांची गरज होती. चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी सावध फलंदाजी करत सामना १२ चेंडूत १५ धावा असा आणला. ४९ व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर चाहरने चमीराला चौकार मारत इक्वेशन १० चेंडूत १० धावा असे आणले.

या दोघांनीही कोणतीही गडबड न करता सामना ७ चेंडूत ७ धावा असा आणला. भुवनेश्वरने चमीराच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारत षटकात १२ धावा वसूल केल्या. त्यामुळे भरताला अखेरच्या षटकात विजयासाठी फक्त ३ धावांची गरज होती.

दीपक चाहरने शेवटचे षटक टाकणाऱ्या रजिताच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले. चाहरने ८२ चेंडूत नाबाद ६९ धावांची झुंजार खेळी केली. तर भुवनेश्वर कुमारने संयम दाखवत २८ चेंडूत १९ धावांची खेळी करुन दीपक बरोबर आठव्या विकेटसाठी ८४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

श्रीलंकेकडून हरसंगाने चांगली गोलंदाजी करत ३ विकेट घेतल्या. तर रजिता, संदकन आणि शनकाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

नाणेफेक जिंकणाऱ्या श्रीलंकेची दमदार सुरुवात

श्रीलंका आणि  भारत ( Sri Lanka vs India ) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मिनोद भानुका आणि अविष्का फर्नांडो यांनी नाबाद अर्धशतकी सलामी देत लंकेला १० षटकात ५९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

ही सलामी जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत होते. पण, यझुवेंद्र चहलने १४ व्या षटकात ३६ धावांवर खेळणाऱ्या मिनोद भानुकाला बाद करत ही जोडी फोडली. भानुका बाद झाल्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षा यालाही यझुवेंद्र चहल पुढच्याच चेंडूवर बाद करत लंकेला पाठोपाठ दोन धक्के दिले.

पाठोपाठ दोन धक्के बसलेने श्रीलंकेची धावगती मंदावली. दरम्यान सलामीवीर अविष्का फर्नांडोने अर्धशतकी खेळी करत संघाचे शतक धावफलकावर लावले. पण, अनुभवी भुवनेश्वर कुमारने त्याला अर्धशतकानंतर लगेचच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामुळे लंकेची अवस्था २५ षटकात ३ बाद १२४ अशी झाली.

लंकेची मधली फळी ढेपाळली ( Sri Lanka vs India )

त्यानंतर दीपक चाहरने सेट झालेल्या धनंजया डी सिल्वा याला ३२ धावांवर बाद करत श्रीलंकेला चौथा धक्का दिला. चार फलंदाज बाद झाल्यानंतर दासून सनका आणि चरीथ असलंका यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, यझुवेंद्र चहलने एकदा लंकेला धक्का देत सनकाला १६ धावांवर बाद केले.

निम्मा संघ माघारी गेल्यानंतर हरसंगा आणि सेट झालेल्या असलंका यांनी लंकेला २०० च्या जवळ पोहचवले. मात्र हरसंगाने ८ धावांनंतर असलंकाची साथ सोडली. त्याला दीपक चाहरने ८ धावांवर बाद करत लंकेला सहावा धक्का दिला.

असलंका आणि करुणारत्नेने सावरले( Sri Lanka vs India )

यानंतर मात्र श्रीलंकेच्या असलंकाने करुणारत्नेला साथीला घेत भागिदारी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ५० धावांची भागिदारी रचत लंकेला समाधानकारक स्थितीत आणून ठेवले.

मात्र अखेरची काही षटके शिल्लक असताना भारताने पुन्हा लंकेला धक्के दिले. भुवनेश्वर कुमारने ६५ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या असलंकाला बाद करुन लंकेला सातवा धक्का दिला. त्यानंतर आलेला दुष्मंता चमीरा यांना २ धावांची भर घालून माघारी परतला. त्याचीही शिकार भुवनेश्वरनेच केली.

अखेरच्या षटकात फलंदाजीला आलेला लक्षण संदकनही शुन्यावर धावबाद झाला. अखेर करुणारत्नेने भुवनेश्वर टाकत असलेल्या ५० षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर दोन चौकार मारत श्रीलंकेला २७५ धावांपर्यंत पोहचवले. करुणारत्नेने ३३ चेंडूत ४४ धावांची आक्रमक खेळी केली.

हेही वाचले का?

पाहा फोटो : क्रिकेटर अॅश्ले बार्टी कशी झाली विंबल्डन चॅम्पियन

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button