रोहित शर्मा सरावात कॅप्टन, केएल राहुल शतक | पुढारी

रोहित शर्मा सरावात कॅप्टन, केएल राहुल शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क :

भारत आणि काऊंटी इलेव्हन यांच्यात होत असलेल्या सराव सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतर भारताने डाव सावरत दिवस अखेर ९ बाद ३०६ धावा केल्या. केएल राहुलने दमदार १०१ धावांची शतकी खेळी केली. तर त्याला साथ देणाऱ्या रविंद्र जडेजाने ७५ धावांची खेळी केली.

भारत ४ ऑगस्ट पासून इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारत काही सराव सामने खेळणार आहे.

आजपासून काऊंटी इलेव्हन विरुद्ध सुरु झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी भारताने विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि आर. अश्विन यांना विश्रांती दिली आहे.

या सामन्यासाठी भारताने रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली आहे.

या सामन्यात केएल राहुल विकेटकिपरची भुमिका पार पाडणार आहे. संघातील दोन प्रमुख विकेट किपर ऋषभ पंत आणि वृद्धीमान साहा दोघेही संध्या विलगीकरणात आहेत. त्यामुळे राहुलवर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने सराव सामन्यात पहिल्या दिवशी भारताने ९ बाद ३०६ धावा केल्या.  पण, भारताची सुरुवात खराब झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल लवकर बाद झाले. रोहितने ९ तर मयांक अग्रवालने २८ धावा केल्या.

त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराला २१ धावाच करता आल्या तर हनुमा विहारीही ७१ चेंडूत २४ धावा करुन बाद झाला.

भारताचे चार फलंदाज बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने पाचव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी रचली. राहुलने १०१ धावांची दमदार शतकी खेळी केली.

त्यानंतर दुसऱ्या बाजूने जडेजानेही अर्धशतकी ( ७५ ) खेळी करत फलंदाजीचा सरावा केला. जडेजाच्या या खेळीमुळे भारत पहिल्या दिवशी ३०० च्या जवळ पोहचला. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या ९ बाद ३०६ धावा झाल्या होत्या.

खेळ थांबला त्यावेळी जसप्रीत बुमराह ३ तर मोहम्मद सिराज १ धाव करुन नाबाद होते.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : संह्याद्रीतील अनोखा हिरवा बेडूक

Back to top button