WTC : कोहली ब्रिगेडचे ‘फायनल’चे स्वप्न भंगण्याची शक्यता, कारण... | पुढारी

WTC : कोहली ब्रिगेडचे ‘फायनल’चे स्वप्न भंगण्याची शक्यता, कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क; World Test Championship : केपटाऊन कसोटीत पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने गमावली. ज्यानंतर द. आफ्रिकामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्णच राहिले आहे. या पराभवाची जखम ताजी असतानाच टीम इंडियाला आणखी एक धक्का बसणार असल्याचे चित्र आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) गुणतालिकेवरही याचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. केपटाऊन कसोटीनंतर डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत भारतीय संघाची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. टीम इंडिया चक्क टॉप 4 मधून बाहेर पडली आहे. तिस-या कसोटीपूर्वी टीम इंडिया चौथ्या स्थानी होती. आता केपटाऊन कसोटी गमावल्यानंतर यात अजून एक स्थानाची घसरण झाली असून टीम इंडिया पाचव्या स्थानी पोहचली आहे. याच कारणामुळे टीम इंडियाचे डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहचण्याचे स्वप्न भंगाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आयसीसीने केपटाऊन कसोटीच्या निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची नवी गुणतालिका (WTC) प्रसिद्ध केली. या तालिकेत टीम इंडिया टॉप 4 मधून बाहेर पडल्याचे दिसत असून द. आफ्रिकेच्या संघाने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. टीम इंडियाने आतापर्यंत चॅम्पियनशीपमध्ये 3 मालिका खेळल्या आहेत. ज्यात 9 सामन्यामधील 4 सामने जिंकले असून तीन सामन्यांत पराभव झालेला आहे. तर दोन सामने ड्रॉ झाले आहेत. टीम इंडियाने गमावलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने हे द. आफ्रिकेच्या भूमीवरील आहेत. यामुळे कोहली ब्रिगेडचे मोठे नुकसान होणार आहे. याच कारणामुळे आता टीम इंडियाचा डब्ल्यूटीसीची फायनल गाठण्याचा मार्ग कठीण बनला आहे.

गुणतालिकेत (WTC) श्रीलंका संघ अव्वलस्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत दोन सामन्यांची एकच कसोटी मालिका खेळली आहे. त्याचबरोबर ॲशेस मालिकेत चमकदार कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. कांगारू संघानेही आतापर्यंत फक्त एकच मालिका खेळली आहे. जी अजूनही सुरू आहे. पाकिस्तानचा संघ 36 गुण आणि 75 टक्के विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंड, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे संघ गुणतालिकेत (WTC) अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. इंग्लंड संघाने आतापर्यंत दोन मालिका खेळल्या आहेत. इंग्लिश संघाने आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकला असून त्यांना पाच सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

Back to top button