नाशिकच्या गोशाळेचा उपक्रम : शेणापासून पर्यावरणपूरक सरपणनिर्मिती | पुढारी

नाशिकच्या गोशाळेचा उपक्रम : शेणापासून पर्यावरणपूरक सरपणनिर्मिती

नाशिक (वणी) : अनिल गांगुर्डे
कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या वाहनांमधून सुटका केलेल्या 596 गायी वणी येथील गोशाळेत ठेवण्यात आलेल्या आहेत. येथील व्यवस्थापन मंडळाने गायींच्या शेणापासून लाकडासारख्या सरपणाची निर्मिती केली आहे. या प्रयोगामुळे पर्यावरणाच्या रक्षण संवर्धनाबरोबरच व्यवस्थापनाला उत्पन्नाचे एक नवीन साधन निर्माण झाले आहे.

मागील काही काळात तालुक्यात विविध भागांत कत्तलीसाठी जाणार्‍या अनेक गोवंशांची सुटका पोलिस तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या पशुधनाच्या संवर्धनासाठी लागणारा खर्च त्यांच्यापासून मिळणार्‍या दूध व शेणापासून मिळणार्‍या उत्पादनावरच केला जातो. येथील शेणाची बाजारात मिळणार्‍या दराला विक्री केली जात असे. यातून गायींना चारा-पाण्याची व्यवस्था होते. अडीच एकर जागेत भाडे करारवर सुरू असलेल्या या शाळेत गायींच्या देखभालीसाठी 14 व्यक्ती काम करतात. याव्यतिरिक्त श्रीकृष्ण गोसेवा समितीस 10 ते 12 लाख रुपयांची देणगी दानशूर व्यक्तींकडून मिळत असते. असे असले तरी चारा, सरकीची ढेप याच्या वाढत्या किमतीचा विचार करता गोशाळेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, या अडचणीवर मात करण्यासाठी आता गोशाळेने नवीन प्रयोग केला असून, यात गायींच्या शेणापासून थेट सरपगण (जळावू) तयार केले जात असल्याचे गोशाळेचे अध्यक्ष विजय बोरा सांगितले. येथे दररोज निघणार्‍या सुमारे एक हजार किलोच्या शेणापासून लाकूड तयार केले जात आहे. अशा प्रकारचे लाकूड परराज्यात काही गोशाळेकडून तयार केले जात असल्याची माहिती संचालक मंडळाने मिळवली होती. एक झाड उभे राहण्यासाठी जवळपास 10 ते 15 वर्षे लागतात आणि या झाडांचे लाकूड मृतदेह जाळण्यासाठी वापरले जाते. पण, हेच शेणापासून बनविल्या गेलेल्या लाकडापासून पर्यावरणाचा र्‍हास होत नाही. गवरी जळताना ऑक्सिजन सोडते. पर्यावरणास शुद्ध करते. हे लाकूड बनविण्यासाठी गोशाळेने एक मशीन हरियाणा येथून खरेदी केले आहे. या मशीनच्या साह्याने शेण आणि भुसा मिक्स करून लाकडे बनविली जात आहेत. येथे साधारण लाकडाची एक जाड पट्टी काढण्यास 40 ते 50 सेकंद लागतात. तसेच दीड ते दोन किलो शेण लागते. चार माणसे यासाठी मशीनवर लागतात. या लाकडाला सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, कोविड काळात लाकडाला पर्याय म्हणून अंत्यसंस्कारासाठी अनेकांनी या सरपणाचा वापर केला. त्यासाठी सुरुवातीला क्विंटलला 1,100 रुपये दर होता. मात्र, जसजशी मागणी वाढत गेली तसतसा तर दीड हजारांपर्यंत तर आता 2,500 रुपये आहे. जानेवारी ते मे असे पाच महिने हे लाकूड बनविण्यासाठीचा कालावधी असतो. या काळात साधारण वर्षभर पुरेल एवढा साठा गोदामात जमा केला जातो. मागणीप्रमाणे तो वजन करून दिला जातो. येथील शेणखतापासून वर्षाला अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे गोशाळेचे विजय बोरा यांनी सांगितले.

अशी होते लाकूडनिर्मिती…
सोयाबीन, मका, उडीद, चना, मूग, गहू याचा भरडा गोशाळेत असलेल्या चक्कीत भरडून तो मोठ्या ड्रममध्ये साठवून सरकीच्या ढेपमध्ये मिसळून एकत्रित केला जातो. शेणाला आधी शेतकर्‍यांचे सोने म्हटले जात असे. काळानुरूप ते मागे पडले होते. मात्र, आता शेणाला नवीन पर्याय सापडल्याने शेतकर्‍यांना नवा रोजगाराचा मार्ग मिळाला आहे. यातून पर्यायी संवर्धनाबरोबरच आर्थिक उत्पन्नदेखील मिळवता येणार आहे.

* एक झाड उभे राहण्यासाठी लागतात 10 ते 15 वर्षे
* एक पट्टी काढण्यास 40 ते 50 सेकंद लागतात
* गोसेवा समितीकडे आहेत 596 गायी
* जानेवारी ते मे या पाच महिन्यांत होते उत्पादन

हेही वाचा:

Back to top button