फुरसुंगी : योजनेसाठी 73 कोटी, पण पाणी कधी मिळणार? | पुढारी

फुरसुंगी : योजनेसाठी 73 कोटी, पण पाणी कधी मिळणार?

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा : उरुळी देवाची, फुरसुंगी या गावांसाठी विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आलेली 73 कोटींची पाणीयोजना कधी पूर्ण होणार आणि पालिकेचे टँकर कायमचे बंद होऊन नळाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केव्हा होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत या दोन गावांसाठी ही विशेष पाणीयोजना राबविण्यात येत आहे.

त्या अंतर्गत लष्कर पाणीपुरवठा या ठिकाणी या दोन्ही गावांसाठी पाणीपुरवठा आरक्षित करण्यात आला आहे. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीद्वारे हडपसर येथील तुकाई टेकडीवर पाणी आणण्यात येणार असून ,या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या 33 दशलक्ष क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी शुद्ध करण्यात येणार आहे.

त्यानंतर हे पाणी फुरसुंगी व उरुळी देवाची या दोन्ही गावांत उभारण्यात येत असलेल्या विविध क्षमतांच्या 13 साठवण टाक्यांमध्ये पाठवून तेथून जलवाहिन्यांमार्फत या गावांतील घरोघरी नळांद्वारे पुरविण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रांचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. दोन्ही गावांत जलवाहिनी टाकण्याचे कामही बहुतांश ठिकाणी पूर्ण झाले आहे.

सुमारे वीस वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे या दोन्ही गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले होते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून दहा वर्षांपासून या गावात पालिकेचे पाण्याचे टँकर येत आहेत. तेव्हापासून पिण्याच्या पाण्यासाठी हे टँकर व हे पाणी मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड येथील रहिवाशांच्या नशिबी आली आहे.

Back to top button