आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकची ओळख आता भगर हब..! आज महाराष्ट्र मिलेट्स मिशन | पुढारी

आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकची ओळख आता भगर हब..! आज महाराष्ट्र मिलेट्स मिशन

नाशिक : दीपिका वाघ
वर्षाला 1,500 टन उत्पन्न मिळविणारे आणि तब्बल 75 वर्षांपासून संपूर्ण भारतभरात सुमारे 95 टक्के भगर निर्यात करणारे नाशिक आता ‘भगर हब’ अशी ओळख मिळवू पाहात आहे. केवळ प्रचार, प्रसार न झाल्यामुळे ही ओळख लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. यंदा ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023’ निमित्त धार्मिकनगरी नाशिकची ओळख ‘भगर हब’ म्हणूनही नावारूपास येत आहे.

नाशिकमध्ये 35 ते 40 भगर मिल्स असून, या सर्व मिल्स मिळून वर्षाला साधारणत: 1,500 टन भगरीचे उत्पन्न होते. पेठ, हरसूल, सुरगाणा, जव्हार, त्र्यंबकेश्वर, मोखाडा, पेण, पनवेल या भागांतून चांगल्या दर्जाच्या भगरीचे उत्पन्न होते. मिलमध्ये येणारा 15 टक्के कच्चा माल महाराष्ट्रातून, 85 टक्के मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात राज्यांतून, त्यापैकी ओरिसातून 35 टक्के भगर नाशिकमध्ये येते. त्यामुळे भगरीला नावे वेगवेगळी असतात, आकारात फरक, पोषणमूल्यांमध्ये फरक असतो. त्यांच्या कच्च्या मालाच्या किमतीत फरक असतो. उदा : कोदू भगरीत कार्बोहायड्रेडचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिची किंमत जास्त असते. संपूर्ण भारताला नाशिकमधून जवळपास 95 टक्के भगर निर्यात केली जाते. तृणधान्यातील महत्त्वाचे तृणधान्य असलेल्या भगरीसाठी लागणारा कच्चा माल वेगवेगळा आहे. वरई, गोद्रा, उद्गी, सावा, राळा हे तृणधान्यातील प्रकार आहेत. या सगळ्यांपासून भगर तयार होते. वरईची भगर, राळ्याची भगर, साव्याची भगर या सर्व भगरी एकट्या नाशिक जिल्ह्यात तयार होतात. हंगामानुसार भारतात शहरातून भगर निर्यात केली जाते. महाशिवरात्री, नवरात्र याकाळात भगरीला सर्वाधिक मागणी असते. पूर्वी तृणधान्य हे गरिबांचे अन्न म्हणून ओळखले जायचे. भगर फक्त उपवासाला खाल्ली जाते, असा समज होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव म्हणून भगर फारशी स्वच्छ येत नसे. प्रकियेअभावी उत्पादन कमी झाल्याने बाजारात चांगल्या दर्जाची एकसारखी भगर मिळत नसे. भगर ही साबुदाण्यापेक्षा स्वस्त, हलक्या दर्जाची असल्याने त्याकडे दुर्लक्ष होऊन उपवासाला साबुदाणा खाल्ला जात. त्यामुळे भगर इंडस्ट्री वर्षातून चार महिने सुरू असे. आताच्या घडीला नवीन तंत्रज्ञानामुळे चांगल्या दर्जाची भगर बाजारात कुठेही मिळते.

प्रक्रियेची नैसर्गिक पद्धत
ज्वारी, बाजरी, नाचणी हे तृणधान्य लगेच खाता येते पण भगरीवर जोपर्यंत प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत ती खाण्यायोग्य होत नाही. कच्च्या मालाच्या स्वरूपात भगर मिलमध्ये आल्यावर त्यात काडी, कचरा, माती असते. त्यानंतर मिलमध्ये अत्याधुनिक यंत्रणेने भगर स्वच्छ केली जाते. त्यावरील टरफल काढून ती खाण्यायोग्य होते. त्यासाठी कोणतेही पाणी किंवा फवारणी केली जात नाही.

तृणधान्यांना मिळतेय ग्लोबल रूप
भारत हा मधुमेह, कर्करोगाची राजधानी होत चालला आहे. त्यामुळे ग्लुटेनफ्री अन्न म्हणून लोक आता तृणधान्य सेवन करायला लागले आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, भगरीपासून अनेक पदार्थ होत असल्यामुळे लोकांच्या खाण्याच्या पद्धती आता बदलत आहेत. तृणधान्यांची ग्लोबल ओळख निर्माण होत आहे.

इतर राज्यांमधून 85 टक्के भगर नाशकात येते. भगर शेतीचे क्षेत्र वाढले पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. इतर राज्यातून कच्चा माल घेण्यापेक्षा महाराष्ट्रात कच्चा माल तयार झाला, तर शेतकर्‍यांचा फायदा होईल. – महेंद्र छोरिया, अध्यक्ष, भगर मिल असोसिएशन.

आज महाराष्ट्र मिलेट्स मिशन
रविवारी (दि. 12) नाशिक भगर मिल असोसिएशन यांच्या सहकार्याने शहरात तब्ब्ल 4 हजार किलो भगर केली जात असून, आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्समधील मिलेट्स प्रकारातील हे एकमेव रेकॉर्ड होणार असल्याने त्याची नोंद घेतली जाणार आहे.

1959 पासून आजोबांनी मिलेट्स युनिटला सुरुवात केली. 2012 पासून व्यवसायात सहभागी झालो. त्यानंतर गेल्या 10 वर्षांपासून तंत्रज्ञानावर भर देऊन व्यवसायात अनेक बदल केले आहेत. -सिद्धार्थ जैन, मॅजिक मिलेट्स प्रा. लि., दिंडोरी.

हेही वाचा:

Back to top button