दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह | पुढारी

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह

नाशिक : 
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. एकदा ते प्यायले की तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही’, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. शिक्षणाचे महत्त्व माहिती असल्याने डॉ. आंबेडकर यांनी प्रत्येकास शिक्षण घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी शहरात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृह स्थापन केले. त्यात मुलींच्या निवासव्यवस्थेसह शिक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळाची 1941 मध्ये स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहाचा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते 1954 मध्ये या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन केले. त्यानंतर बांधकाम पूर्ण होऊन वसतिगृह 1 जुलै 1956 रोजी सुरू झाले. सुरुवातीस सात मुलींच्या प्रवेशापासून किस्मतबाग येथे भाड्याच्या जागेत हे वसतिगृह सुरू झाले होते. सुरुवातीला काही वर्षे मुलींच्या भोजनाचा व शालेय साहित्याचा खर्च स्वतः दादासाहेबांनी केला. नंतर मुलींची संख्या वाढल्याने दादासाहेबांनी टिळकपथ, शालिमार भागात संस्थेच्या स्वतःच्या जागेत दगडी बांधकाम असलेली इमारत उभारली. सात मुलींपासून सुरू झालेल्या वसतिगृहात कालांतराने 24, 50 मुली, 100 मुलींपर्यंत वसतिगृहाची क्षमता वाढली. सद्यस्थितीत या वसतिगृहात 180 मुलींना प्रवेश देण्याची क्षमता आहे. सन 2015 पर्यंत वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम जुने होते. त्यात 180 मुलींच्या निवासासह भोजनगृह होते. आठ खोल्यांमध्ये मुलींच्या निवासाची सोय होती. त्यामुळे मुलींच्या निवासात मोठी अडचण निर्माण होत असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्ताने 2015 मध्ये बाबासाहेबांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला होता. त्यानुसार या निर्णयात संस्थेच्या 1767 चौरस मीटर जागेत मुलींच्या वसतिगृहासाठी इमारत बांधकामांसाठी चार कोटी 29 लाखांचा निधी मंजूर केला. प्रत्यक्ष बांधकामास 2019 मध्ये सुरुवात झाली. 2 वर्षांत या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तीनमजली इमारतीत मुलींच्या निवासासाठी 20 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये 8 बेड आहेत. तर कार्यक्रम, उपक्रमांसाठी एक मोठा बहुद्देशीय हॉल आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गरम पाण्यासाठी सोलर सिस्टीम बसविण्यात आली आहे. स्वयंपाकासाठी सुसज्ज किचन निर्माण करण्यात आले आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा जतन ठेवण्याचे काम त्यांचे नातू अध्यक्ष कुणाल गायकवाड, सचिव पी. के. गायकवाड, कोषाध्यक्ष सुधीर गायकवाड, कुंदन गायकवाड, प्रकाश सोनवणे, सुरेखा पवार, सुमन जाधव, अधीक्षिका बेबीताई डेर्ले गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.

वसतिगृहास भेट दिलेल्या मान्यवर व्यक्ती 

वसतिगृह इमारतीच्या कोनशीलेचे अनावरण बडोद्याचे महाराज फत्तेसिंग गायकवाड यांच्या हस्ते 6 जानेवारी 1962 रोजी झाले. वसतिगृहाचे उद्घाटन भारताचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 9 जून 1963 मध्ये झाले. वसतिगृहाला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, लोकजनशक्ती पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष रामविलास पासवान, रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी भेटी दिल्या आहेत. वसतिगृहातील प्रवेशप्रक्रिया : मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृहात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. अनुसूचित जाती, जमाती, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनींना आरक्षणनुसार वसतिगृहात प्रवेश देण्यात येत असतो. निवास, भोजन, गणवेश आदी सुविधा विद्यार्थिनींना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात.

वसतिगृहातील ऐतिहासिक दस्ताऐवजांचे जतन

* काळाराम मंदिर सत्याग्रहापूर्वी व सत्याग्रहानंतर लंडन येथे वास्तव्यास असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेल्या एकूण 8 पत्रांचा संग्रह या वसतिगृहात जतन करून ठेवला आहे.
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे खासदार असताना त्यांनी अनेक विषयांवर संसदेत अभ्यासपूर्ण भाषणे केली होती. त्यांच्या सुमारे 600 भाषणांचा संग्रह वसतिगृहात जतन करून ठेवण्यात आला आहे.
* कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवनमानातील महत्त्वपूर्ण घटनांचा सचित्र आढावा घेणारे ‘स्वतंत्र छायाचित्र दालन’ वसतिगृहाला भेट देणार्‍या नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.

– गौरव अहिरे, प्रतिनिधी.

हेही वाचा:

Back to top button