दै. पुढारी विशेष शैक्षणिक : उपेक्षित वर्गाचा आधारस्तंभ क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था | पुढारी

दै. पुढारी विशेष शैक्षणिक : उपेक्षित वर्गाचा आधारस्तंभ क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्था

नाशिक : 
देशाच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात वंजारी व इतर उपेक्षित अशा मागासलेल्या समाजातील लोकांसाठी जिव्हाळ्याचा आधारस्तंभ म्हणून डोंगरे वसतिगृह उभे राहिले. दि. 16 एप्रिल 1920 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभहस्ते नाशिक येथे संस्थेचा वंजारी बोर्डिंग या नावाने शुभारंभ झाला. कालांतराने संस्थेचे नामकरण ‘डोंगरे विद्यार्थी वसतिगृह’ असे झाले.

सुरुवातीला या ठिकाणी दहा खोल्या, एक स्वयंपाकघर व भोजनघर होते. या बोर्डिंगमध्ये राहून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. त्यापैकी काही मंत्रालय, शासकीय, निमशासकीय अधिकारी, पोलिस विभाग, राजकीय नेते, उद्योजक, व्यापार अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करून नावलौकिकास पात्र ठरले. दिनांक 6 जानेवारी 1953 मध्ये संस्थेची अधिकृत नोंदणी झाली. क्रांतिवीर वसंतराव नाईक हे स्वातंत्र्याकरिता ब्रिटिशांविरुद्ध चले जाव चळवळीत अग्रेसर होते. महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या चले जाव चळवळीत कॉलेज सोडून क्रां. वसंतराव नाईक साहेबांनी उडी घेतली. नाशिक जिल्ह्यासह अनेक ठिकाणी भूमिगत राहून त्यांनी तरुणांना संघटित केले. त्यांच्या कुशल नेतृत्वाच्या प्रेरणेमुळे महाराष्ट्रातल्या इतर भागांप्रमाणे नाशिक जिल्हादेखील आंदोलनात अग्रेसर राहिला. यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. देशहितासाठी त्यांनी अविवाहित राहून आपले संपूर्ण जीवन राष्ट्राला अर्पण केले. सन 1937 ते 1968 या कालावधीत नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात ते कार्यरत होते. त्या काळात त्यांनी प्रामुख्याने कामगार चळवळ, शेतकरी चळवळ व तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याचे कार्य केले. राज्याचे आजचे एस. टी. परिवहन महामंडळ स्थापन करण्यात कै. सुरेश सरैय्या यांच्याबरोबर त्यांचा मोलाचा सहभाग होता. क्रांतिवीर वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कामगारांच्या माध्यमातून कामगार संघटना बळकट केली. सर्व कामगारांची एकजूट करून त्यांनी प्रथम विडी कामगार, वीज कामगार, गिरणी कामगार, गोदी, इंजिनिअरिंग, सिक्युरिटी प्रेस, साखर कारखाना कामगार, भांडी बनविणारे व खासगी क्षेत्रातील कामगारांना खर्‍या अर्थाने न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हिंदू मजदूर संघाची स्थापना करून त्या सर्व कामगारांना एकत्रित करून त्यांचे कणखर नेतृत्व केले. कामगारांना पगारवाढ, रजा इतर सुख-सोयी सुविधा आदी मागण्या त्यांनी मालकांकडून पदरात पाडून घेतल्या व या चळवळीद्वारे सर्वांना न्याय मिळवून दिला. दि. 27 सप्टेंबर 1969 रोजी डोंगरे विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रांगणात त्यांच्या नावाने क्रां. वसंतराव नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना तत्कालीन समाजधुरिणांनी केली. सुरुवातीला 1970-71 मध्ये वेहेळगाव, राजापूर व वडाळी येथे शाळांना परवानगी मिळाली. पुढे 1971-72 मध्ये शिवरे, तालुका निफाड व एकलहरे येथे सुरू झाल्या. त्यानंतर नाशिक येथे हिंदी विद्यालयास सुरुवात झाली. 1984-85 पासून 2000 पर्यंत सिन्नर, दिंडोरी, निफाड, नांदगाव व इगतपुरी तसेच इतरही ठिकाणी संस्थेच्या शाळा सुरू झाल्या. संस्थेने 1998 मध्ये उच्च शिक्षणात पदार्पण करून नाशिक येथे अनुदानित वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले. सन 2001 मध्ये दिंडोरी येथे अनुदानित व सन 2021-2022 मध्ये सिन्नर येथे वरिष्ठ महाविद्यालये सुरू केली.

संस्थेने 2010-11 मध्ये तंत्रनिकेतन व 2011-12 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करून संस्थेच्या नावलौकिकात भर घातली. त्यानंतर सन 2018-19 मध्ये बी. फार्मसी कॉलेज सुरू केले आणि सन 2020-21 यावर्षी डी. फार्मसी कॉलेज सुरू केले. आज रोजी संस्थेचे सहा पूर्व प्राथमिक शाळा, सहा प्राथमिक शाळा, एकतीस माध्यमिक शाळा, एक आय.टी.आय., तीन वरिष्ठ महाविद्यालये, एक तंत्रनिकेतन महाविद्यालय, एक पदवी अभियांत्रिकी महाविद्यालय, एक बी फार्मसी कॉलेज व एक डी.फार्मसी कॉलेज अशा एकूण 66 शाखा जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यात ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून, शेकडो कर्मचारी व शिक्षक कार्यरत आहेत. पूर्वी डोंगरे विद्यार्थी वसतिगृह व व्ही. एन. नाईक एज्युकेशन सोसायटी या दोन वेगवेगळ्या संस्था जिल्ह्यात कार्यरत होत्या. डोंगरे विद्यार्थी वसतिगृहाकडे मोकळी जागा, तर क्रां. व्ही. एन. नाईक एज्युकेशन सोसायटीकडे शाळा होत्या. त्यामुळे कामकाज करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे समाजाची एकच संस्था असावी, असा विचार पुढे आला. डोंगरे विद्यार्थी वसतिगृहाचे तत्कालीन अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उपाध्यक्ष बाळासाहेब एकनाथ गामणे, सरचिटणीस अ‍ॅड. पी. आर. गिते, सहचिटणीस बाळासाहेब महादू सानप व व्ही. एन. नाईक एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत तुकाराम दिघोळे, उपाध्यक्ष प्रभाकर पांडुरंग धात्रक, दिलीप हिरामण धात्रक, सरचिटणीस दिवंगत एम. बी. कुटे या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व समाजातील ज्येष्ठ नेते यांच्या पुढाकाराने दोन्ही संस्थांचे विलीनीकरण करून संस्थेचे नाव क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था असे ठेवण्यात येऊन संस्था अस्तित्वात आली व सर्व समाजाने त्याला मान्यता दिली. अशा रीतीने निःस्वार्थी, निरपेक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी समाजसेवक क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या नावाने आज ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचा व्याप, पसारा, वृद्धी व विकास सर्वार्थाने समाजातील गोरगरीब व उपेक्षित घटकांसाठी व्हावा म्हणून संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.

– वैभव कातकाडे, प्रतिनिधी.

कुशल संघटक व प्रभावशाली वक्ते
नाईक साहेबांकडे नेतृत्व गुण उपजतच होते. शिस्तप्रिय तितकेच मायाळू व धाडसी स्वभावाचे असल्याने त्या काळात त्यांनी अनेक मित्रही जोडले. कुशल संघटक व प्रभावशाली वक्ते असल्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व इतरांवर आपल्या कामामुळे छाप पाडीत असे. त्यांच्या रसाळ-मृदु-ओजस्वी तेजस्वी वक्तृत्वाचा श्रोत्यांवर दिर्घकाळ परिणाम होत असे. ते सर्वगुण संपन्न थोर सेनानी, त्यागी, निस्वार्थी देशभक्त होते. समाज कार्य करत असतांना त्यांचे 14 डिसेंबर 1968 रोजी निधन झाले. क्रां. वसंतराव नाईकांचे संपूर्ण जीवन संघर्षमय व प्रेरणादायी आहे. त्यांचे समर्पित जीवन व क्रांतिकारी विचार भावी पिढीस चिरंतन ऊर्जा देत राहतील.

हेही वाचा:

Back to top button