

कुठल्याही क्रिकेटपटूसाठी उत्तम सराव कुठचा असेल तर तो सामन्याचा. कुणी म्हणेल की मग आयपीएल एकप्रकारे या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या संघातील खेळाडूंना सरावच देत आहे? सराव हा एका विशिष्ट परिस्थितीत खेळायचा असतो. आयपीएलचे सामने त्या खेळाडूला आपला टच दाखवायची संधी देईल, पण तो कसोटीसाठीचा सराव कधीही ठरू शकत नाही. कुणाची अशी समजूत असेल की अजिंक्य रहाणेच्या आयपीएलमधील धडाकेबाज कामगिरीवर त्याचे पुनरागमन झाले तर ती चुकीची आहे. रहाणेच्या रणजी करंडकातील 11 डावांतील 57.63 च्या सरासरीने काढलेल्या 663 धावा हे त्याच्या निवडीचे मुख्य कारण आहे. किंबहुना, कसोटी संघासाठी आयपीएलपेक्षा किंवा एकूणच टी-20 पेक्षा रणजी करंडकाची कामगिरी जास्त महत्त्वाची ठरते हे यातून पुन्हा अधोरेखित झाले. जेव्हा श्रेयस अय्यर दुखापतीने बाहेर गेला, सूर्यकुमार यादवचा कसोटीसाठी विचार करायला वेळ लागेल अशी परिस्थिती होती आणि रहाणेचा बॅटवर चेंडू येण्याचा उत्तम टच आयपीएलमध्ये दिसला तेव्हा बीसीसीआयला खडबडून जाग आली आणि रहाणेला आयपीएलमध्येच लाल चेंडूवर सराव करायच्या सूचना दिल्या. (Ajinkya Rahane)
या एका घटनेवरून लाल चेंडूच्या सामन्यासाठी लाल चेंडूचा सराव हे बीसीसीआय जाणते याला पुष्टी मिळते तर या 11 खेळाडूंना पुढचा एक महिना जास्तीत जास्त लाल चेंडूचा सराव मिळण्याची तजवीज बीसीसीआयने केली पाहिजे. भारताच्या संघाची परदेशातील कामगिरी सुधारली असली, ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात दोनदा आपण हरवले हे जरी खरे असले तरी भारताची परदेशातील कामगिरी सुधारते ती जसजसा दौरा पुढे सरकतो तशी. इथे हा दौरा नाही तर एकमेव कसोटी आहे तेव्हा कामगिरी सुधारायला वाव नाही. इंग्लंडला उत्तम कामगिरी करायची असेल तर तिथल्या वातावरणातला सराव हा एकमेव पर्याय आहे. कितीही कसलेला आणि अनुभवी खेळाडू असला तरी इंग्लंडचे वातावरण हे सतत परीक्षा घेणारे असल्याने या वातावरणातील बदलांना अनुसरून खेळायचा सराव अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यातून हा सामना ओव्हलवर जूनच्या सुरुवातीला होणार आहे. इंग्लंडमधल्या उन्हाळ्याची ही सुरुवात आहे. (Ajinkya Rahane)
इंग्लंडमध्ये कौंटी हंगाम सुरू आहे. या सामन्याच्या खेळपट्टीवर जर काही कौंटी सामने खेळले जाणार नसतील तर या खेळपट्टीवर उत्तम गवत राखले असेल. ओव्हलची खेळपट्टी ही फलंदाजीला अनुकूल असते, हे इतिहास सांगतो. नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करणे पसंत करतो. कारण इथे पहिल्या डावातील धावसंख्येची सरासरी 357 आहे. प्रश्न असा उरतो की आयपीएल खेळून झाल्यावर जे खेळाडू फिट असतील ते दमलेल्या अवस्थेत इंग्लंडला पोहोचल्यावर ही 357 ची सरासरी आपल्याला कोण गाठून देणार? ऑस्ट्रेलिया आपले कसोटी क्रिकेट किती गंभीरतेने घेते हे त्यांच्या तयारीवरून दिसून येईल. यंदाच्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे 13 खेळाडू आहेत, पण जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी त्यांनी जो संघ जाहीर केला आहे त्यातले फक्त कॅमेरून ग्रीन आणि जोश हेजलवूड आयपीएल खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाला नुसता हा जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा सामनाच महत्त्वाचा नाही तर त्यामागोमाग इंग्लंडमध्ये होणार्या अॅशेसची तयारीही त्यांनी आताच जोरदार सुरू केली आहे. अॅशेसचा संघ अजून जाहीर व्हायचा आहे, पण इंग्लंडमधील उत्तम कामगिरी आपल्याला अॅशेसच्या संघात स्थान देईल, या हेतूने तब्बल 21 ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कौंटी क्रिकेट खेळायला इंग्लंड आताच गाठले आहे. बरं यात त्यांचे वर्क लोड मॅनेजमेंट बघाल तर जे प्रमुख खेळाडू आहेत ते त्यांच्या खेळानुसार मोजकेच सामने खेळणार आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी भारताविरुद्धच्या संघातील खेळाडूंचा विचार केला तर 4 मेपासून स्टीव्ह स्मिथ आपल्या पुजाराबरोबर ससेक्स तर्फे, लॅबुशेन (ग्लॅमर्गन), मार्कस हॅरीस (ग्लुस्टेशायर) हे खेळणार आहेतच, पण त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची राखीव फळी म्हणजे पीटर हँडस्कोम्ब, कुहेनमन, पीटर सिडल, बॅनक्रॉफ्ट हेही इंग्लंडमध्ये सराव घेत आहेत. आयपीएलचे प्ले ऑफचे संघ 21 मे रोजी ठरले की बाकीच्या 6 संघांतील या कसोटीसाठीचे खेळाडू लगबगीने इंग्लंड गाठतील. बीसीसीआय आपल्या बळावर त्यांची कुठेतरी क्लब पातळीवर सरावाची सोय करेल, पण ते पुस्तकांचा अभ्यास न करता गाईड वाचून परीक्षा देण्यासारखे असेल. आयपीएलमध्ये आज रोहित शर्माचा एक फलंदाज म्हणून फॉर्म चिंताजनक आहे. त्याचे पाय इथे या गर्मीत हलत नसतील तर इंग्लंडला काय होईल ही चिंता वाटते. कदाचित त्याला क्रिकेटपासून दूर एक-दोन आठवड्यांची विश्रांती फायद्याची ठरेल, पण मालक तितकी रजा देणार नाहीत. आज रोहित शर्मा, गिल, कोहली, रहाणे, सिराज आणि शमी यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपायची वेळ आली आहे. रोहित शर्माचा फिटनेसचा इतिहास बघता तो संपूर्ण आयपीएल खेळला तर उपकर्णधार नसलेल्या आपल्या कसोटी संघाला भाकरी फिरवायची वेळ येऊ शकते. यापेक्षा या एका महिन्यात बीसीसीआयने या कसोटी संघातील खेळाडूंना सक्तीने विश्रांती अथवा लवकरात लवकर इंग्लंडला पाठवायला आपल्या धोरणाची भाकरी फिरवणे जास्त श्रेयस्कर ठरेल. (समाप्त)
– निमिष पाटगावकर
हेही वाचा;