Neeraj Chopra : विजयाचे समाधान, पण दिल्ली अभी दूर !

Neeraj Chopra : विजयाचे समाधान, पण दिल्ली अभी दूर !

दोहा; वृत्तसंस्था : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने आपल्या मोसमाची सुरुवात डायमंड लीगमधील विजयाने केली असली तरी त्याला अपेक्षित असलेले 90 मीटरचे अंतर पार करता आले नाही. यासाठी आगामी स्पर्धांमध्ये आणखी जोर लावू, असे नीरज म्हणाला. कतार स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर झालेल्या मोसमातील पहिल्या डायमंड लीगमध्ये नीरजने 88.67 मीटर अशी कामगिरी करताना बाजी मारली. गतवर्षी त्याने डायमंड लीगची अंतिम फेरी जिंकली होती. (Neeraj Chopra)

विजय कठीण होता; मात्र समाधानी आहे. मोसमाची सुरुवात चांगली झाली, अशी प्रतिक्रिया नीरजने स्पर्धा संपल्यावर दिली. सध्या तरी मी पूर्णपणे तंदुरुस्त राहण्यावर भर देत आहे आणि सातत्य राखून जास्तीत जास्त चांगली कामगिरी कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रित करीत आहे, असेही तो म्हणाला. दोहामधील कामगिरीमुळे तो मोसमातील आघाडीचा भालाफेकपटू झाला आहे. (Neeraj Chopra)

सध्या तो तुर्कीत सरावाला आहे. येथे त्याने पहिल्याच प्रयत्नात 8867 मीटर अंतरावर भाला फेकला. ही कामगिरी त्यास अव्वल स्थान मिळवून देण्यास पुरेशी ठरली. गेल्या वर्षी विश्वविजेत्या अँडरसन पीटर्स व झेकचा याकूब वाल्डेज यांनी 90 मीटर पेक्षा अधिक फेक केली होती. येथे कायमच 90 मीटर पेक्षा अधिक फेक होते, हे नीरजने स्पर्धेच्या आधी मान्य केले होते. नीरजचे लक्ष्यही 90 मीटर होते; मात्र जोरदार वार्‍यामुळे 90 मीटर भाला फेकणे आव्हानात्मक होते.

गेल्या वर्षी 93.07 मीटर अशी कामगिरी करणार्‍या पीटर्सला 85.88 मीटर कामगिरीसह तिसरे स्थान मिळाले; तर वाल्डेजने दुसर्‍या प्रयत्नात 88.63 मीटर अशी कामगिरी करताना दुसरे स्थान पटकावले. माजी ऑलिम्पिक विजेता त्रिनिदादचा केशॉर्न वॉलकॉट सहावा; तर युरोपियन विजेता जर्मनीचा ज्युलियन वेबर चौथा आला. माजी विश्वविजेत्या केनियाच्या ज्युलियस येगोला एकही अधिकृत फेक करता आली नाही. नीरजला 8, वाल्डेजला 7 व पीटर्सला 6 डायमंड लीग गुण मिळाले.

नीरजशिवाय एल्डोस पॉल हा अन्य भारतीय थलिट या स्पर्धेत सहभागी झाला होता. 11 दिग्गजांचा समावेश असलेल्या तिहेरी उडीत तो दहाव्या स्थानावर आला.

वार्‍यामुळे भाला फेकणे सर्व स्पर्धकांसाठी आव्हानात्मक होते. तरीही मी माझ्या कामगिरीविषयी समाधानी आहे. पुढच्या वेळेस आणखी दूरपर्यंत भाला फेकण्याचा प्रयत्न करेन.

– नीरज चोप्रा

हेही वाचा; 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news