

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार रजनीकांत (Thalaiva Rajinikanth) यांची संपूर्ण देशात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. रजनीकांतची क्रेझ सिनेसृष्टीपासून ते खऱ्या आयुष्यापर्यंत पाहायला मिळते. त्यांचा एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की चित्रपटगृहांमध्ये उत्सवाचे वातावरण असते. थलैवाला सोशल मीडियावर फॉलो करणारे बरेच लोक आहेत. तसेच ते लोक देखील रजनिकांत यांच्यासारखी स्टाईल आणि स्वॅग फॉलो करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती हुबेहुब रजनीकांतसारखी दिसत आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीची चालण्याची शैली हुबेहुब रजनीकांत यांच्यासारखी आहे. दुरून तो हुबेहूब रजनीकांतसारखा दिसतो.
रजनीकांत (Thalaiva Rajinikanth) म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मिथकच आहे. ७१ वर्षांचे रजनीकांत आज देखिल हिरोच्याच भूमिकेत काम करताना दिसतात. त्यांच्या समकालीन सर्व अभिनेते अगदी अमिताभ बच्चन यांच्यासह सर्वजण आता चरित्र भूमिका करत आहेत. पण रजनिकांत यांना लोक अजून ही ३० किंवा ३५ वर्षांपुर्वी ते जसे दिसत होते तसेच पाहण्यास इच्छुक असतात. रजनीकांत देखिल आपल्या चाहत्यांना कधीही निराश करत नाहीत. ७१ व्या वर्षी देखिल ते अगदी पंचवीशीतील तरुण नायकाला लाजवेल इतक्या उर्जेने काम करताना दिसतात. तसेच ते आपल्या नातीच्या वयाच्या अभिनेत्रीशी रोमान्स देखिल तितक्याच सहजतेने पडद्यावर साकारतात. चाहत्यांसाठी हा त्यांचा अभिनेता नेहमी चिरतरुण असावा असेच वाटते.
रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट 'अन्नाथे' हा होता, या चित्रपाटच्या कथेने प्रेक्षकांच्या मनाला खोलवर स्पर्श केला. या चित्रपटात रजनीकांतसोबत नयनतारा आणि कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट भाऊ-बहिणीच्या नाते संबधांवर आधारित होता. OTT वरही याला उदंड प्रतिसाद मिळाला. रजनीकांत यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्यांनी शाळेत महाभारतातील एकलव्याची भूमिका साकारली होती. रजनीकांत यांनी बंगळुरू परिवहन सेवेत बस कंडक्टर म्हणून काम केले आणि याच काळात ते थिएटरशीही जोडले गेले. दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या सल्ल्याने त्यांनी तमिळ भाषा शिकून त्यांच्या चित्रपटात काम केले. अशा प्रकारे ते साऊथे सुपरस्टार बनले.