

Chhaya Kadam wildlife meat consumption Legal Action
मुंबई :
सैराट, लापता लेडीज सारख्या चित्रपटामध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री छाया कदम अडचणीत सापडली आहे. वन्य प्राण्यांच्या मांस सेवन केल्याच्या आरोपावरून छाया कदम विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी PAWS मुंबईने केली आहे.
मुंबई बेस्ड एनजीओ प्लांट अँड ॲनिमल वेलफेयर सोसायटी (PAWS) ने वन अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून तक्रार दाखल केली आहे. अलिकडच्या मुलाखतीत संरक्षित वन्यजीव प्रजातींचे मांस सेवन केल्याची कथित कबुली अभिनेत्री छाया कदमने दिली होती. या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या NGO ने केली आहे. जंगली प्राण्यांची शिकार आणि मांस सेवन केलेल्या तसेच नियमांचे उल्लंघन केलेल्यांची चौकशी करण्याची मागणी या संस्थेने केली आहे. ठाणे वन विभागाने चौकशी सुरू केली असल्याची माहिती समोर येतेय.
विभागीय वन अधिकारी (दक्षता) रोशन राठोड यांनी सांगितले की, छाया कदम यांच्याविरोधात तक्रार आलेली आहे. ते म्हणाले, "आम्हाला एक तक्रार मिळालीय. ती आम्ही चीफ कंझर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट आणि डेप्युटी कॉन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्टला चौकशीसाठी पाठवले आहे. मग अभिनेत्रीला बोलावले जाईल."
PAWS-मुंबईचे संस्थापक सुनीश सुब्रमण्यम कुंजू म्हणाले, “आमच्या टीमला अभिनेत्री छाया कदम यांची मुलाखत मिळाली. जिथे तिने YouTube वर पोस्ट केलेल्या रेडिओ मुलाखतीत उंदीर हरण, ससे, रानडुक्कर, मॉनिटर लिझार्ड यासारख्या संरक्षित वन्यजीव प्रजातींचे मांस खाल्ल्याचा दावा केला होता. मुलाखतीला अपराधाची कबुली मानली पाहिजे. मांसासाठी वन्यजीवांच्या शिकारीच्या या गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असलेल्या तिच्या आणि इतरांवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो.”