

Indian Idol Winner Abhijeet Sawant Feared Long-Term Contracts After Victory: 2004 मध्ये ‘इंडियन आयडल 1’ जिंकून अभिजीत सावंत एका रात्रीत स्टार झाला होता. मात्र अभिजीतच्या मनात भीती होती. ही गोष्ट त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली आहे. अभिजीत सावंतने सांगितलं की, शो जिंकल्यानंतर त्याला सर्वात जास्त भीती होती ती मोठ्या म्युझिक कॉन्ट्रॅक्टची.
“कोणतीही म्युझिक कंपनी आपल्याला एखाद्या करारात अडकवेल आणि त्यामुळे आपलं करिअर बर्बाद होईल,” अशी भीती त्याला होती. तो म्हणाला की, ‘मी एका छोट्या शहरातून आलो होतो. रोज कोणत्या तरी कोपऱ्यात चहा पिणारा मी, अचानक संपूर्ण देशाने मला डोक्यावर घेतलं. लोकप्रियता पाहून मला घाबरायला व्हायचं.’
त्या काळात आजच्या सारखी सोशल मीडियावर इंडस्ट्रीची माहिती मिळत नव्हती, असंही त्याने सांगितलं. ‘आजची पिढी जास्त कॉन्फिडेंट आहे. पण आमच्या वेळी मोठ्या पैशाच्या ऑफर आल्या की शंका यायची, कुठे फसवणूक तर होत नाही ना? घरच्यांनीही सावध राहण्याचा सल्ला दिला होता. मला वाटायचं, एखादा 5-10 वर्षांचा करार साइन करून घेतला जाईल आणि मग आयुष्यातले महत्त्वाचे दिवस वाया जातील,’ असं त्याने सांगितलं.
इंडियन आयडल जिंकल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलल्याचाही अनुभव त्याने सांगितला. ‘मी घरी जायचो तेव्हा घराबाहेर कायम गर्दी असायची. लोक, चाहते, चाहत्यांची प्रतिक्रिया – हे सगळं हाताळणं अवघड होतं. पण प्रत्यक्षात तसं काही वाईट घडलं नाही. मी काही वर्षे सोनीसोबत काम केलं आणि चांगल्या व्यावसायिक नात्यांमुळेच करिअरला दिशा मिळाली,’ असं अभिजीत म्हणाला.
पुढे ‘मोहब्बतें लुटाऊंगा’, ‘मर जावां मिट जावां’ आणि ‘हॅपी एंडिंग’ यांसारख्या गाण्यांमुळे अभिजीत सावंतने आपली वेगळी ओळख निर्माण केली. लोकप्रियतेच्या सुरुवातीच्या काळात असलेली भीती कमी झाली, असंही त्याने सांगितलं.