पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिजीत सावंतने आपल्या आवाजाने संपूर्ण भारताला वेड लावलं आहे. टेलिव्हिजनचा लोकप्रिय सिंगिंग स्टार म्हणून अभिजीत ओळखला जातो. सिंगिंग आयडॉल असणाऱ्या अभिजीत सावंतची खेळी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. 'बिग बॉस मराठी'मध्ये न पाहिलेला अभिजीत सावंत दिसणार असल्याचं त्याने स्वत:च सांगितलं आहे.
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक म्हणून अभिजीत सावंत ओळखला जातो. गाण्यापासून त्याचा प्रवास सुरू झाला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अभिजीतचं आयुष्य एका रिअॅलिटी शोमुळे रातोरात बदललं. आता 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याला लोकांसमोर येण्याची संधी मिळाली आहे. घरात जाण्याआधी
'बिग बॉस मराठी'बद्दल बोलताना अभिजीत म्हणाला,"आता गाण्यासह माझं व्यक्तिमत्त्वदेखील प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिजित सावंतबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला बिग बॉसद्वारे कळणार आहेत. माझ्यासोबत ज्यांचं चांगलं जमेल त्यांच्यासोबतच्या गंमतीजंमती तुम्हाला पाहायला मिळतील".
अभिजीत सावंत पुढे म्हणाला, "बिग बॉस मराठी'च्या घरातील सर्व सदस्यांसोबत जमवून घेण्याचा मी प्रयत्न करेल. मी स्वत:ला एक फॅमिली मॅन समजतो. त्यामुळे ज्यावेळेला एका वेगळ्या फॅमिलीमध्ये जाईल, त्यावेळेला त्या फॅमिलीलादेखील आपलंसं करण्याचा प्रयत्न करेल. मला हे आवडेल की, मी ज्या गोष्टी पद्धतशीरपणे लोकांसमोर मांडू शकेल, त्या गोष्टी मी त्याच पद्धतीने मांडेल. ज्यापद्धतीने त्यांना त्या कळतील. त्यामुळे मी नेहमीच लोकांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करेल".