Sanchita Ugale: 'कुमकुम भाग्य' ते 'छावा'... अभिनेत्री संचिता उगले कोण होती? कोणत्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं?

Who Was Sanchita Ugale: 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री संचिता उगले हिचे वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन झाले असून तिचा मृतदेह नालासोपारा येथील घरात आढळला.
Who Was Sanchita Ugale
Who Was Sanchita UgalePudhari
Published on
Updated on

Who Was Sanchita Ugale: हिंदी टेलिव्हिजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगले हिने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. नालासोपारा येथील तिच्या राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात आणि तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता उगले ही आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपारा येथे राहत होती. 14 जून रोजी सायंकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

'कुमकुम भाग्य'मधून मिळाली ओळख

संचिता उगलेने हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'कुमकुम भाग्य'मधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. या मालिकेत तिने 'दिया टंडन' ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. एका मुलाखतीत तिने 'कुमकुम भाग्य'मधील काळ हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असल्याचे सांगितले होते.

अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली

'कुमकुम भाग्य'नंतर संचिता 'वागळे की दुनिया' या मालिकेत 'रुचिता जेटली'च्या भूमिकेत दिसली होती. यानंतर तिला दंगल टीव्हीवरील 'दिलवाली दुल्हा ले जाएगी' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिने 'सुकून' ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले होते.

चित्रपट आणि ओटीटी विश्वातही उमटवला ठसा

टेलिव्हिजनपुरतीच मर्यादित न राहता संचिता उगलेने चित्रपट आणि ओटीटी विश्वातही आपली छाप पाडली होती. विकी कौशल अभिनित ऐतिहासिक चित्रपट 'छावा'मध्ये तिने 'ताराराणी'च्या तरुणपणातील भूमिका साकारली होती. तसेच मनोज बाजपेयी यांच्या 'सायलन्स 2' या ओटीटी प्रोजेक्टमध्येही ती झळकली होती.

Who Was Sanchita Ugale
Bharat Bhhagya Viddhaata BO: ‘भारत भाग्य विधाता’ची बॉक्स ऑफिसवर घसरगुंडी; 3 दिवसांत किती कोटी कमावले?

स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जात होती

संचिता तिच्या स्पष्ट आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जात होती. करिअरमधील अपयश, संघर्ष आणि मानसिक ताण याविषयी ती खुलेपणाने बोलत असे. एका मालिकेत मुख्य भूमिकेसाठी निवड झाल्यानंतरही अखेरच्या क्षणी तिला बदलण्यात आल्याचा अनुभव तिने सांगितला होता. त्या प्रसंगाने तिला मोठा धक्का बसला होता, मात्र त्यातूनच पुढे जाण्याची ताकद मिळाल्याचेही तिने म्हटले होते.

सोशल मीडियाच्या दबावाबाबत व्यक्त केली होती चिंता

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिशा अग्रवालच्या मृत्यूवर प्रतिक्रिया देताना संचिता उगलेने सोशल मीडियावरील वाढता दबाव आणि ऑनलाइन मान्यतेच्या हव्यासाबाबत चिंता व्यक्त केली होती. तरुण पिढी मानसिक तणावाला सहज बळी पडत असल्याचे तिने म्हटले होते.

पोलिसांकडून तपास सुरू

संचिताचे वडील मच्छिंद्र उगले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अचोले पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, संचिता उगलेच्या निधनाने हिंदी मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला असून तिच्या अचानक जाण्याने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news