Aamne Samne: 'फक्त दीड हजारांसाठी तडकाफडकी…', रोहन गुजर-केतकी विलासचा संताप; निर्मात्यांचा मेसेजही केला उघड, पाहा व्हिडिओ

Rohan Gujar Ketaki Vilas Controversy: ‘आमने सामने’ या नाटकातून अचानक बाजूला केल्यामुळे अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांनी निर्मात्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे.
Aamne Samne Controversy
Aamne Samne ControversyPudhari
Published on: 
Updated on: 

Rohan Gujar Ketaki Vilas Controversy: ‘आमने सामने’ या नाटकातून अचानक बाजूला करण्यात आल्याने अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांनी संताप व्यक्त केला होता. दोघांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली. त्यानंतर नाटकाचे निर्माते मंगेश कदम आणि लीन भागवत यांनीही व्हिडीओ शेअर करत या प्रकरणाची दुसरी बाजू स्पष्ट केली. कलाकारांनी तिसऱ्यांदा मानधनवाढीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले होते. आता या व्हिडीओला उत्तर देताना रोहन आणि केतकी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे निर्मात्यांनी मांडले नसल्याचे म्हटले आहे. तसेच, निर्मात्यांनी पाठवलेला एक मेसेजही त्यांनी वाचून दाखवला. यापुढे या विषयावर कोणतीही चर्चा करायची नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या बाजूने या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.

आठ वर्षांत तीन वेळा मानधनवाढ

निर्मात्यांनी तिसऱ्यांदा मानधनवाढ मागितल्याचा उल्लेख केला. मात्र, ही मागणी आठ वर्षांच्या कालावधीत करण्यात आली होती, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नसल्याची खंत रोहन आणि केतकी यांनी व्यक्त केली. त्यामुळे कलाकारांनी एकाच वर्षात तीन वेळा मानधनवाढ मागितल्याचा गैरसमज निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

याबाबत बोलताना रोहन आणि केतकी म्हणाले, “आम्ही आमच्या निर्मात्यांचा व्हिडीओ पाहिला, त्याखाली आलेल्या कमेंट्स वाचल्या. त्यांची नाण्याची दुसरी बाजू आम्ही ऐकली. पण, ती बाजू मांडत असताना अनावधानाने, चुकून किंवा सोयीस्कररित्या, मुद्दामून काही मुद्दे आले नाहीत म्हणून आम्ही हा व्हिडीओ शेअर करतोय. पण, या व्हिडीओनंतर आम्हाला या मुद्द्यावर कोणतीही चर्चा करण्याची इच्छा नाही. आमच्या निर्मात्यांनी तिसरी मानधन वाढ हे जितक्या ठामपणे सांगितलं…तेवढ्याच ठामपणे त्यांनी हे नाही सांगितलं की, आठ वर्षांतली तिसरी मानधनवाढ…आता असा समज झाला आहे की, आम्ही एका वर्षात तीनवेळा पैसे वाढवून मागितले. पण, तसं नाहीये. आठ वर्षांत तिसरी मानधनवाढ म्हणजे आपण सरासरी जरी पाहिलं तरी अडीच ते पावणे तीन वर्षांत तिसरी मानधनवाढ असा याचा अर्थ होतो.”

निर्मात्यांचा मेसेज वाचून दाखवला

मानधनवाढीचा मुद्दा स्पष्ट करताना रोहन आणि केतकी यांनी याआधी झालेल्या मानधनवाढींचाही उल्लेख केला. पहिली मानधनवाढ चार वर्षांनंतर झाली होती. ती वाढ किरकोळ असल्याचे निर्मात्यांनीही मान्य केले होते, असे त्यांनी सांगितले. दुसरी मानधनवाढ सहा वर्षांनंतर झाली. या काळात नाटक एकदा बंद पडले होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू झाले आणि प्रयोगांना हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळू लागल्यानंतर त्यांनी मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला होता.

निर्मात्यांनी कलाकारांच्या मागण्या सहज मान्य केल्याचे सांगितल्याबद्दलही रोहन आणि केतकी यांनी आक्षेप घेतला. आपली मागणी मान्य करताना निर्मात्यांनी पाठवलेला मेसेजही त्यांनी यावेळी वाचून दाखवला.

ते म्हणाले, “पहिली मानधनवाढ जी झाली होती ती चार वर्षांनंतर…जी अत्यंत किरकोळ होती, हे स्वत: निर्मात्यांनी मान्य केलं आहे. दुसरी मानधनवाढ झाली…सहा वर्षांनी, त्यामध्ये एकदा आमचं नाटक बंद पडलं होतं, ते परत नव्याने सुरू झालं. मग, हाऊसफुल्ल प्रयोग सुरू झाले…त्यानंतरच आम्ही मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला. आमच्याकडेही मेसेज आहेत…ते व्हिडीओमध्ये बोलले की, त्यांच्या मागण्या आम्ही सहज मान्य केल्या. हे चुकीचं आहे. मी त्यांचं मेसेजमधील एक वाक्य वाचून दाखवते… ‘निर्माता म्हणून स्वत:ला मुरड घालून मी ही वाढ करीत आहे असो!’ म्हणजे ही मानधनवाढ सुद्धा त्यांनी मनापासून केलीच नव्हती… आणि तिसरी मानधनवाढ जी आम्ही वर्षभरानंतर आता मागत होतो.”

नाटकाला चांगला प्रतिसाद मिळूनही मानधनवाढ नाही

नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होत असतानाही निर्मात्यांनी स्वतःहून मानधनवाढीचा प्रस्ताव कधी मांडला नाही, असे रोहन आणि केतकी यांनी सांगितले. नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत होता आणि बुकिंगही चांगले सुरू होते. तरीही मानधन वाढवून देण्याबाबत निर्मात्यांकडून पुढाकार घेण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले.

ते म्हणाले, “या सात वर्षांत आमचे निर्माते स्वत:हून कधीच असं बोलले नाहीत की, आपलं नाटक आता छान सुरूये. बुकिंग चांगलंय, हाऊसफुल्ल होतंय…तर आपण तुमचे पैसे वाढवूयात असं कधीही म्हणाले नाहीत. बरं जेव्हा आता आम्ही पैसे वाढवून मागितले तेव्हा असंही म्हटलं की, जर आता नाटकाचं बुकिंग उतरलं तर आम्ही पाकिटाचा फेरविचार करू. म्हणजे प्रतिसाद नसेल तर कमी पाकिटातही आम्ही हे नाटक करायला तयार होतो पण, आम्हाला त्यात शेवटपर्यंत काम करायचं होतं.”

Aamne Samne Controversy
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! सलग चौथ्या दिवशी भाव वाढले, चांदी मात्र स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

“या दीड हजारांसाठी आम्हाला रिप्लेस केलं”

कोरोना काळातही आपण निर्मात्यांना सहकार्य केलं होतं, याची आठवण रोहन आणि केतकी यांनी करून दिली. लॉकडाऊननंतर जेव्हा ५० टक्के प्रेक्षक क्षमतेने नाटकाचे प्रयोग सुरू होते, तेव्हा निर्मात्यांनीही मानधन ५० टक्के देण्याची विनंती केली होती. त्यावेळी आपण कोणतीही तक्रार न करता ही अट मान्य केली होती, असे त्यांनी सांगितले.

मात्र, सात वर्षे प्रामाणिकपणे एकत्र काम केल्यानंतर मानधनात केवळ १,५०० रुपयांची वाढ मागितल्यामुळे आपल्याला अचानक नाटकातून बाजूला करण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत रोहन आणि केतकी म्हणाले, “लॉकडाऊनमध्ये जेव्हा ५० टक्के प्रेक्षक क्षमतेवर प्रयोग सुरू होते…तेव्हा निर्मात्यांनी विनंती केली होती की, प्रेक्षक ५० टक्के येत आहेत तर आम्ही पाकिटही ५० टक्के देऊ. तेव्हा सुद्धा आम्ही तयार झालो होतो. जर आम्ही गेली सात वर्षे प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर काम करतोय, तर वाढवून मागितलेले १५०० तुम्हाला मोठे वाटतात.

या दीड हजारांसाठी तुम्ही आम्हाला रिप्लेस करता ते पण एकदम तडकाफडकी…कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. मग, या गोष्टीचं आम्हाला वाईट का वाटू नये? खरंच इतकं मन लावून आम्ही काम केलं. ज्या लोकांबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही उभे राहिलो आणि जेव्हा चांगले दिवस आले तेव्हा आम्हाला वाईट पद्धतीने बाजूला करण्यात आलं.”

Aamne Samne Controversy
Best Indian Web Series: मिर्झापूर-द फॅमिली मॅन टॉप 3 मधून OUT! मग गेल्या गेल्या 10 वर्षांतील नंबर 1 वेब सीरिज कोणती? पाहा यादी

“आमच्या बाजूने पूर्णविराम…”

‘आमने सामने’ या नाटकातील मानधनवाढ आणि कलाकारांना अचानक बाजूला करण्याच्या मुद्द्यावरून रोहन गुजर, केतकी विलास आणि निर्माते मंगेश कदम व लीन भागवत यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. दोन्ही बाजूंनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपापली भूमिका मांडली आहे.

मात्र, आता या विषयावर आणखी चर्चा करण्याची इच्छा नसल्याचे रोहन आणि केतकी यांनी स्पष्ट केले आहे. आपली बाजू मांडल्यानंतर यापुढे या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगत त्यांनी “आमच्या बाजूने पूर्णविराम…” अशी भूमिका घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news