

मराठ्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची प्रेरणादायी कथा सांगणारा ‘वीर मुरारबाजी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, पुन्हा एकदा इतिहास मोठ्या पडद्यावर जिवंत होणार आहे.
Marathi Movie Veer Murarbaji release date out
मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांचे वेगळे स्थान आहे आणि अशाच भव्य परंपरेत आता आणखी एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाची भर पडणार आहे. ‘वीर मुरारबाजी’ हा चित्रपट मराठा साम्राज्यातील पराक्रमी योद्धा मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्यगाथेवर आधारित असून, त्याची अधिकृत रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच चित्रपटाचा काऊंटडाऊनही सुरु झाला आहे.
निर्मात्यांच्या मते, ‘वीर मुरारबाजी’ हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून नव्या पिढीला मराठ्यांच्या इतिहासाची ओळख करून देणारा आहे. शौर्य, निष्ठा, स्वराज्य आणि बलिदान या मूल्यांचा गाभा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
अशा असतील चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका
चित्रपटात दीपिका चिखलिया, अरुण गोविल, अंकित मोहन, तनीषा मुखर्जी, सौरभ राज जैन, अन्य कलाकारांच्या भूमिका आहेत. तान्हाजी: द अनसंग वॉरियर चित्रपटातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी एलाक्षी गुप्ता देखील 'वीर मुरारबाजी'मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. सौरभ राज जैन शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असणार आहे. वीर मुरारबाजी चित्रपटाचे दिग्दर्शन अजय आरेकर आणि अनिरुद्ध आरेकर यांनी केलं आहे. अल्मंड्स क्रिएशन द्वारा निर्मित चित्रपटात अंकित मोहन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'फत्तेशिकस्त'आणि 'पावनखिंड' चित्रपटानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स 'वीर मुरारबाजी चित्रपट आणत आहेत. आलंमड्स क्रिएशनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिलीय-
''छत्रपति शिवाजी महाराज
जिनके स्वप्न से स्वराज्य बना,
उन्हीं के चरणों में शत-शत नमन।
वीर मुरारबाजी बाजी
१९ फ़रवरी २०२६''
स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांच्या शौर्याचा इतिहास प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात 'पुरंदरचे काळभैरव' म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा १९ फेब्रुवारी, २०२६ रोजी 'वीर मुरारबाजी' या चित्रपटातून येणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये रिलीज होणार आहे.