Usha Nadkarni: उषा नाडकर्णींना या लोकप्रिय आयटम सॉन्गची ऑफर आली अन्; वाचा भन्नाट किस्सा
अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना कोण ओळखत नाही? रंगभूमीपासून रिअलिटी शोपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. रंगभूमी, मराठी आणि हिंदी मालिका, मराठी सिनेमा यातून त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला आहे. 78 वर्षांच्या उषा याना त्यांच्या जवळच्या व्यक्ती आऊ म्हणून ओळखतात. अजूनही त्या तितक्याच उमेदीने आनंदाने आणि उत्साहाने अभिनय क्षेत्रात अॅक्टिव दिसतात. (Latest Entertainment News)
त्यांना मराठी नाटकांनी जितकी ओळख दिली. पण त्याहीपेक्षा जास्त मराठी मालिकेतील सासूच्या व्यक्तिरेखेने दिली. माहेरची साडी या मराठी सिनेमातील त्यांची व्यक्तिरेखा विशेष गाजली. प्रत्येक प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या उषा नाडकर्णी अलीकडे सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया या रिअलिटी शोमध्ये दिसल्या होत्या. पण सध्या त्या जास्त चर्चेत आहेत ते त्यांच्या मुलाखतीमुळे.
एका प्रसिद्ध पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या जीवनाचे अनेक पैलू उघडले आहेत.
त्यापैकी एक खास आठवण त्यांनी शेयर केली आहे ती इस्रायलबाबत. उषाताई आपल्या इस्रायलच्या आठवणीबाबत एक मजेशीर किस्साही शेयर केला आहे.
उषाताई या तीनवेळा इस्रायलला जाऊन आल्या आहेत त्याबाबत बोलताना त्या म्हणतात, तुम्हाला पटणार नाही पण पवित्र रिश्ता ही मालिका तिथे प्रचंड लोकप्रिय होती. जे भारतीय वंशाचे लोक तिथे स्थायिक आहेत ते ही मालिका आवर्जून पाहात. मी आजवर तीनवेळा इस्रायलला जाऊन आले आहे. त्यापैकी सर्वात पहिल्यांदा गेले होते ते नाटकासाठी. दुसऱ्यांदा पवित्र रिश्ताच्या एका इव्हेंटसाठी. खरेतर या इव्हेंटमध्ये माझा सक्रिय असा सहभाग नव्हता. पण पवित्र रिश्ताच्या माझ्या क्रेझने तिथल्या चाहत्यांनी मला भेटण्याची मागणी केली होती.
या दरम्यान तिथल्या लोकांकडून मला कोंबडी पळाली या गाण्यावर आयटम सॉन्ग करण्याची विनंती केली. माझ्या मनात विचार आला मी काय आयटम गर्ल आहे? मी त्यांना कळवले, मी अभिनय करते डान्स मला येत नाही. यानंतर तिसऱ्यांदा मी माझ्या मुलाला घेऊन गेले होते. तिथे त्यावेळी लंडनची आजीबाई नाटकाचा प्रयोग होणार होता. तिथे माझे फॅन्स पाहून माझा मुलगा चांगलाच प्रभावित झाला होता. तो इथे आल्यावर सगळ्यांना सांगत होता, ‘ आऊला तिथे खूप मानतात.’
पहिला परदेशप्रवास कधी?
उषाताईंनी यावेळी त्यांच्या पहिल्या विमानप्रवासाची आठवण शेयर केली. त्या सांगतात, 'पुरुष या हिंदी नाटकासाठी मी पहिल्यांदा परदेशप्रवास केला. या नाटकात नानासोबत काम केले आहे.’
