पुढारी ऑनलाईन डेस्क : सिनेअभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे चार लाखांची रोकड आणि एक निगेटिव्ह रिळ चोरी केली होती. याप्रकरणी आता ओशिवरा पोलिसांनी दोन सराईट चोरट्यांना अटक केली आहे. मजीद शेख आणि मोहम्मद दलेर बर्हीम खान अशी चोरट्यांची नावे आहेत. दोन्ही सराईट चोरटे अशून त्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे.
अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाल्यानंतर आंबोली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली होती. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन तरुणांनी आत प्रवेश करुन ही चोरी केल्याचे उघडकीस आले.
अनुपम खेर यांचे अंधेरीतील विरा देसाई रोडवर एक खासगी कार्यालय आहे. बुधवारी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी काम संपल्यानंतर लॉक लावून निघून गेले होते. रात्री उशिरा दोन तरुण त्यांच्या कार्यालयात घुसले होते. त्यांनी ड्रॉवरमधील चार लाखांची कॅश आणि एक निगेटिव्ह रिळ घेऊन पलायन केले होते. हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.