

स्टार प्रवाहवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘तुझ्याकडे तुला मागणे’ या नव्या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेता राकेश बापटच्या भूमिकेची झलक दाखवणारा पहिला प्रोमो समोर आल्यानंतर मालिकेची नायिका कोण असणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे या मालिकेत ‘इरा’ची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
इरा ही व्यक्तिरेखा आत्मविश्वासू, हुशार आणि स्वतःच्या विचारांवर ठाम असलेली तरुणी आहे. तिच्या स्वभावातील वेगवेगळे पैलू मालिकेतून उलगडताना दिसणार आहेत. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकणारी इरा मनाने अतिशय प्रेमळ आणि मायाळू आहे. समोरच्या व्यक्तीशी आपुलकीने संवाद साधण्याची आणि आपल्या गोड बोलण्याने कठीण प्रसंगही सहज करण्याची हातोटी तिच्याकडे आहे. माणसांना जोडून ठेवणं आणि त्यांची काळजी घेणं हा तिच्या स्वभावाचाच एक भाग आहे.
इरा आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणारी मुलगी आहे. तिला आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगायला आवडतं. लहान मुलांबद्दल मात्र तिच्या मनात विशेष हळवा कोपरा आहे. एखादा प्रामाणिक आणि चांगला माणूस अडचणीत असेल, तर त्याच्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी असते. मात्र तिच्या या चांगुलपणाचा कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला किंवा तिच्यावर त्याग लादला, तर ती गप्प बसत नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना तिच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘इरा’च्या भूमिकेबद्दल बोलताना सायली साळुंखेनेही आपला आनंद व्यक्त केला. तिच्यासाठी ही भूमिका विशेष असल्याचं तिने सांगितलं. इराच्या व्यक्तिरेखेत अनेक वेगवेगळे पदर असल्याचं सायलीने सांगितलं. हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर मराठीमध्येही लक्षात राहील अशी भूमिका करण्याची तिची इच्छा होती. ‘तुझ्याकडे तुला मागणे’च्या माध्यमातून ही संधी मिळाल्याचा आनंद तिने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राकेश बापट आणि सायली साळुंखेची जोडी छोट्या पडद्यावर काय कमाल करते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.